मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे!
मुंबई : लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाही पध्दतीने जेवढी आंदोलन होतील त्याला आम्ही सामोरे जाऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे. आता मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या म्हणतात, ओबीसींमध्ये अगोदरच ३५० जाती आहेत. मात्र, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलेलं आहे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ आता ओबीसी समाजाचे नेते देखील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, दोन्ही समाजाला विनंती आहे, दोन्ही समाजासाठी शासन काम करेल. ओबीसी समाजाने लक्षात ठेवावं आम्ही सर्व प्रश्न सोडवू, मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले, इतर कुणीही प्रश्न सोडवले नाहीत. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं आहे, कोर्टात टिकले आहे. कुठलेही आंदोलन होवो, लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये, उच्च न्यायालयाने काही नियम निकष तयार केले आहेत, त्या चौकटीत आंदोलनकर्ते आणि त्यांच्या नेत्यांनी रहावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
मराठा समाजाची देखील ही जबाबदारी आहे की, त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. मात्र एक गोष्ट खरी आहे, की एसीईबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही, राजकीय आरक्षण हा जर हेतू असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे. जर राजकीय आरक्षण हा हेतू नसेल आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची जर लढाई असेल, नोकरी मिळाली पाहिजे, प्रवेश मिळाला पाहिजे तर मात्र या मागणीचा विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यापूर्वी काय झालं हे तुम्ही सर्वांनी बघितलं आहे, आजही आंदोलनासाठी रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत? हे पाहायला मिळत आहे, पण ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे की, आमच्यासाठी हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू, काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही, असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.