पाकव्याप्त काँग्रेस अधिक धोकादायक- मुख्यमंत्री

0

इचलकरंजी : पाकव्याप्त काश्मीरपेक्षा (पीओके) पाकव्याप्त काँग्रेस अधिक धोकादायक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. इचलकरंजी येथे आज, शुक्रवारी आयोजित विकास पर्व सभेत ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, भारत देशाची ताकद जगाने पाहिली आहे. अवघ्या २३ मिनिटांत पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उध्वस्त केले. असे असताना ‘राहुल विचारतो, ड्रोन किती होते ? कोणी पाडले ? कसे पाडले, अशा मूर्खांना कोण सांगणार ? शेतीचे औषध फवारणीचे ड्रोन वेगळे आणि युद्धाचे ड्रोन वेगळे असतात असे म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या नेत्यांची सगळी मानसिकताही पाकिस्तानने हायजॅक केली आहे. पाकिस्तानने जे प्रश्न विचारायला पाहिजेत, ते प्रश्न राहुल गांधी आणि त्यांचे चेले विचारत सुटले आहेत. त्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसला आहे. त्यामुळे त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

महापुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्याच्या पथदर्शी योजनेची निविदा १५ दिवसांत काढणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. त्यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवली तरी त्याचा धोका पश्चिम महाराष्ट्राला बसणार नाही. तरीही उंची वाढीला आपला विरोध असून, प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सन २०१९ व २०२१ चा महापूर भयानक होता. त्याची कारणे शोधली असता कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने नदी, नाले व ओढे भरून पाणी साचून पूर येतो, हे लक्षात आले. त्यामुळे हे पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी अतिशय पथदर्शी योजना तयार केली आहे. या योजनेची निविदा १५ दिवसांत काढणार आहे. त्यातून ही समस्या सुटेल. अलमट्टी धरणाची उंची वाढीविरोधात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेऊन लढा देऊ; पण आपल्या लोकांवर पुराचं संकट येईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत.

इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नेमका कोणता चांगला आणि कमी विरोधाचा उपाय असू शकेल, हे पाहण्यासाठी आपण एक समिती तयार केली आहे. त्या माध्यमातून शहराला पिण्याच्या पाण्याची शाश्वत योजना लवकरच अंमलात आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच वस्त्रोद्योगासाठी सोलर योजनेतून वीज उपलब्ध करण्याचे नियोजन करू आणि महापालिकेला नवीन कोणत्या माध्यमातून जीएसटी परतावा देता येतो, ते पाहून दोन महिन्यांत त्याचाही निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech