शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे मागणी

0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनात ५५% वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे,सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे २०२५ मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषीमंत्री कोकाटे आणि पणन मंत्री रावल यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थांची भूमिका कमी करावी. २०२५-२६ मध्ये ६ लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून डिबिटी (DBT) प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक करावी. यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर ४०-४५ रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल.

या प्रमुख मागाण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास ग्राहकांनाही वाजवी दरात कांदा उपलब्ध होईल, असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्याच्या तळेगावमध्ये आशियातील प्रथम राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्था ( NIPHT ) – नोडल एजन्सीचा दर्जा देण्याची केंद्राकडे मागणी : महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आणि नेदरलँड्सच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आशियातील प्रथम राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट आफ पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात आली आहे. हरितगृह तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देणारी ही संस्था शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवून उत्पादनांचे मूल्यवर्धन, साठवणूक आणि बाजारपेठेतील स्थैर्य वाढवण्यास मदत करणार आहे.

या संस्थेला नोडल एजन्सीचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मंत्री कोकाटे आणि मंत्री रावल यांनी दिले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत कृषी लॉजिस्टिक्स हब उभारण्यात आला असून, याचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्ते व्हावे यासाठी आज पणन मंत्री श्री रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री चव्हाण यांना निमंत्रण दिले. या हबमध्ये १०,००० मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग-ग्रेडिंग युनिट्स, पेट्रोल पंप, ट्रक टर्मिनल्स व गोदामाची सुविधा आहे. यामुळे फार्म-टू-मार्केट साखळी अधिक सक्षम होणार असून, नुकसानही कमी होईल, अशी माहिती रावल यांनी यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांना दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech