मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण……..
अनंत नलावडे
मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला आता नवी ओळख मिळाली असून यंदा प्रथमच गणेशोत्सव हा राज्यभर ‘राज्यमहोत्सव’ म्हणून साजरा होणार असून, त्याच्या खास बोधचिन्हांचे अनावरण मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या भव्य सोहळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल ११ कोटींचा निधी मंजूर केला असून, त्यात खास महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे असे विविध सांस्कृतिक कार्य,लोककला, स्पर्धा, व्याख्याने,रोषणाई आदींनी सजलेले कार्यक्रम देश-विदेशात महाराष्ट्राचा गजर करणार आहेत.“गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचा व सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू आहे; आता हा उत्सव जगाच्या नकाशावर नेऊ,” असे ठाम आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिले.या महोत्सवाला विशेष उंची देण्यासाठी “ऑपरेशन सिंदूर” (भारतीय सैन्याचा शौर्यगौरव) आणि “स्वदेशीचा जागर” (आत्मनिर्भर भारताची दिशा) हे विषय जोडले गेले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शतकांपासून घराघरात आणि सार्वजनिक स्तरावर साजरा होणारा गणेशोत्सव आता थेट शासनाच्या सहभागातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे.त्यामुळे आता महाराष्ट्राच्या अध्यात्म,भक्ती आणि परंपरेचा हा जगभर एक वेगळाच भक्तिमय सोहळा ठरणार आहे.