आता दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रशिक्षण

0

नवी दिल्ली : दीपस्तंभ फाउंडेशनद्वारे संचालित मनोबल प्रकल्प केंद्राचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी दिल्लीत झाला. या केंद्राद्वारे दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जळगाव आणि पुण्यात यशस्वीपणे कार्यरत असलेला हा प्रकल्प आता राष्ट्रीय राजधानीतही सुरू झाला आहे. उद्घाटन समारोह कस्तूरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.

यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, दिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक-संचालक यजुर्वेंद्र महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर उपस्थित होते. राजेश अग्रवाल यांनी नमूद केले की, गेल्या दहा वर्षांत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य झाले आहे. स्वयंसेवी संस्था, राज्य आणि केंद्र सरकारचे विविध विभाग आणि खासगी क्षेत्रातील दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला आहे, ज्यामुळे सामाजिक संवेदनशीलता वाढली आहे.

संस्थापक-संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, पुढील 25 वर्षांत कोणत्याही दिव्यांग किंवा ट्रान्सजेंडर विद्यार्थ्याला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही. यासाठी त्यांच्या गरजेनुसार योग्य सुविधा आणि संसाधने उपलब्ध करणे आवश्यक आहे. सध्या केवळ 0.02% दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात, तर उर्वरितांना संधी मिळत नाही. दीपस्तंभ संस्था स्वतंत्र भारताच्या शताब्दी वर्षापर्यंत सर्व क्षेत्रांत या समुदायांना अग्रस्थानी आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांनी जळगाव आणि पुण्यातील मनोबल केंद्रांची माहितीही यावेळी दिली.

या कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनू गर्ग (आयएएस), रवि राज (आयआरएस), अश्विनी परकाळे (आयपीओएस), श्रीतेज पटेल (आयआरएमएस), संपदा वांगे, पुनीत गुप्ता (आयआयएम उदयपूर), तुषार चौगुले (एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर), कविता देसले (एमपीएससी), राकेश गुहा (बँक), विशाल शेलार (सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक), वीणा (पीएसआय) आणि प्रतीक जिंदाल (आयडीबीआय बँक) यांचा समावेश होता.

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेची विद्यार्थिनी माऊली आडकर हिने, जी दोन्ही हातांनी विकलांग आहे, हारमोनियमवर ‘सारे जहाँ से अच्छा…’ हे गीत सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech