रत्नागिरीतील विकासकामांसाठी गोवा शिपयार्डकडून २५ लाखाचा निधी – ॲड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील उद्यान, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी गोवा शिपयार्ड कंपनीकडून २५ लाखाचा निधी सीएसआरमधून मंजूर झाला आहे, अशी माहिती स्वतंत्र संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. या कंपनीत २०२१ पासून स्वतंत्र संचालक म्हणून केंद्र शासनाने केलेल्या नियुक्तीनुसार काम करण्याची संधी रत्नागिरीतील अॅड. पटवर्धन यांना प्राप्त झाली आहे. ते म्हणाले, गोवा शिपयार्ड कंपनी शिप बिल्डिंग क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनी असून संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करते. सप्टेंबर १९६७ साली जीएसएलची स्थापना झाली असून या ६० वर्षांत ४०० पेक्षा अधिक जहाजे बांधण्याचे काम गोवा शिपयार्डने केले. त्यापैकी भारतीय नौदलासाठी ८२ शिप, सिमा सुरक्षा दलासाठी ३४ शिप, ४८ शिप निर्यात केली असून २३९ शिप इतर ग्राहकांसाठी तयार करून दिली आहेत. फ्रिगेट शिप, पोल्युशन कंट्रोल शिप, फास्ट पेट्रोल व्हेसल्स आदी विविध प्रकारची व्हेसल्स गोवा शिपयार्डने तयार केली आहेत.

सन २०२१-२२ मध्ये कंपनीचे व्हॅल्यू ऑफ प्रोडक्शन ७०४ कोटी होते ते वाढून २०२४-२५ मध्ये २८०१ कोटी झाले. कंपनीची नेट वर्थ २०२०-२१ मध्ये १०९८ कोटी होती, ती वाढून १६२० कोटी झाली आहे. कंपनीची ऑडिट बुक पोझिशन १६१९३ कोटीपर्यंत पोचली असून २०२१-२२ मध्ये १०१ कोटीचा नफा होता तो सन २०२४ – २५ अखेर २८८ कोटी इतका वाढला आहे. शिपयार्ड क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कंपनी म्हणून गोवा शिपयार्ड काम करत असून संरक्षण क्षेत्रातील या कंपनीमध्ये संचालक मंडळात काम करण्याचा हा अनुभव माझ्यासाठी खूप मौलिक आहे, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.

प्रतिवर्षी कंपनी कायद्याला अनुसरून झालेल्या प्रत्यक्ष नफ्याच्या प्रमाणात कंपनी सीएसआर खर्च करीत असते. या वर्षीच्या कंपनी सीएसआर फंडातून १० लाख रुपये रत्नागिरी शहरातील जयस्तंभानजीकच्या बागेचे सुशोभीकरण, आसन व्यवस्था, खेळणी यासाठी कंपनीने मंजूर केले असून जाकादेवीतील विद्यालयासाठी १० लाखाचे ५ स्मार्ट पॅनल बोर्ड मंजूर केले आहेत. रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी ऑटो रिफ्रेक्टोमीटरसाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech