“शासकीय अधिकारी पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात” – नितीन गडकरी

0

नागपूर : “शासकीय अधिकारी हे पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात. त्यामुळेच अनेक विकासकामांच्या फाईली वर्षानुवर्षे अडकून पडतात,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनावर टीका केली. ते नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापनादिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, एकदा मी एका अधिकाऱ्याला विचारले की, तुम्ही पत्नीवर प्रेम करता ते ठीक आहे, पण फाईलवर इतके का करता ? फाईल आली की ती दाबून ठेवता. मंजूर करायचे असेल तर मंजूर करा, नसेल तर नामंजूर करा पण निर्णय घ्या. उगीचच काम रखडवण्यात काही अर्थ नाही. कर वसूल करा, धाडी मारा, पण निर्णय घेणे गरजेचे आहे. निर्णय न झाल्याने अनेकांचे नुकसान होते. महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार मिळणाऱ्यांना विलंबाचं महत्व कळत नाही, असा टोला गडकरींनी लगावला.

संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांना अधिक महत्व देण्याची गरज असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं. “काही कार्यालयांत अडचणीचे अधिकारी प्रशिक्षण संस्थेत पाठवले जातात. पण अशा ठिकाणी लायक आणि प्रज्ञावंत निवृत्त अधिकाऱ्यांचा उपयोग करावा अशी सूचनाही त्यांनी केली. गडकरी म्हणाले की, “ज्ञानाचा अहंकार मोठा असतो. ‘साला, मैं तो साहब बन गया’ असं बरेच जण समजतात. राजकारणात यालाच ‘चहापेक्षा केटली गरम’ म्हणतात. आमचे पीएसच आमच्यापेक्षा जास्त टाईट असतात,” अशी विनोदी टिप्पणी त्यांनी केली.देशात पैशांची कमतरता नाही, पण प्रामाणीकपणे काम करणाऱ्या चांगल्या लोकांची गरज आहे. माझ्याकडे १५ लाख कोटी रुपये पडून आहेत, पण खर्चच होत नसल्याची खंड गडकरींनी यावेळी व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech