पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुती सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटींच्या पॅकेजची घोषणा

0

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने पंजाब आणि तामिळनाडूपेक्षाही मोठं पॅकेज जाहीर केलं आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही” असा शब्द आम्ही दिला होता आणि तो आम्ही पाळला आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. इतका मोठा पाऊस कधीच पाहिला नव्हता. आम्ही तिघांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन पाहणी केली. राज्यातील २९ जिल्ह्यांतील ३५२ तालुक्यांत नुकसान झालं असून, सुमारे ६५ लाख हेक्टर जमीन बाधित आहे. अशा काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.” तब्ब्ल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधे बिस्किटाचे पॅकेट तरी दिले का…? असा सवाल शिंदे यांनी विचारला.

“सर्व निकष बाजूला ठेवून आम्ही शेतकरी केंद्रबिंदू ठेवला आहे. कितीही आर्थिक ओढाताण असली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफ व्यतिरिक्त पिकांच्या नुकसानीसाठी आम्ही अतिरिक्त १० हजार रुपयांची मदत देणार आहोत,” असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढे सांगितलं की, “अमित शहा आले तेव्हा केंद्र सरकारची मदत मिळावी अशी विनंती केली आणि केंद्र सरकारही राज्याच्या पाठिशी उभं राहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील याबाबत संवेदनशील असून तेही राज्याला नक्की मदत करतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सरकार शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कटिबद्ध आहे. आपला प्रस्ताव लवकरच केंद्राकडे जाईल आणि केंद्राकडून राज्याला नक्की भरीव मदत मिळेल. या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम आम्ही नक्की करू असे यावेळी बोलताना सांगितले.”

अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकं आडवी झाली, पशुधन वाहून गेलं, जमिनींचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी केली होती. आता राज्य सरकारच्या नव्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांची खरवडून गेलेली जमीन पुन्हा नीट करता यावी यासाठी ३ लाख हेक्टरी मनरेगा मधून देण्यात येणार असून, त्याला रॉयल्टी देखील लावली जाणार नाही, तसेच त्यांना पुन्हा रब्बी पिक घेता यावे यासाठी सरसकट हेक्टरी १० हजार रुपये देणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारकडून शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech