गोवा शिपयार्डकडून ‘आयसीजीएस अटल’चे जलावतरण

0

पणजी : संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला एक प्रमुख संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) आज, २९ जुलै, रोजी वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात “आयसीजीएस अटल” चे (यार्ड १२७५) जलावतरण केले – ही आठ अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या वेगवान गस्‍त नौकांच्या (एफपीव्ही) च्या मालिकेतील सहावी नौका आहे. तटरक्षक दलाच्या मुख्यालयातील प्रधान एकात्मिक आर्थिक सल्लागार (पीआयएफए) रोझी अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्‍ये शिल्पा अग्रवाल यांनी या गस्‍त नौकेचे औपचारिक उद्घाटन केले.या नौकेच्या जलावतरण कार्यक्रमामध्‍ये बोलताना, रोझी अग्रवाल यांनी जीएसएलकडून प्रकल्पांची होणारी कार्यक्षम अंमलबजावणी आणि देशाची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी या संस्थेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले.

जीएसएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय म्हणाले की, ‘आयसीजीएस अटल’चे जलावतरण हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. “ही नौका म्हणजे टीम जीएसएलच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. अनेक आव्हाने असूनही जहाजबांधणीच्या कामामध्‍ये आत्मनिर्भर बनणे, त्यामध्‍ये नवीनता आणणे आणि त्यासाठी आवश्‍यक उत्कृष्टतेचा ध्‍यास असलेल्या या टीमची अटल वचनबध्‍दता यातून प्रतिबिंबित होते,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, धोरणात्मक उद्योग भागीदार आणि जीएसएलचे अधिकाऱी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जीएसएलमध्येच आरेखन केलेले ही वेगवान गस्त नौका ५२ मीटर लांबीची आहे, ज्यामध्ये ८-मीटर बीम आणि ३२०-टन ‘डिसप्लेसमेंट’ आहे. अति-वेगवान असलेली ही नौका तटीय गस्त, बेट सुरक्षा मोहिमा आणि अपतटीय मालमत्ता संरक्षण करण्यासाठी सुसज्ज आहे. या स्वदेशी जहाजामुळे भारताच्या सागरी तटावर जागरूकता आणि राष्ट्रीय सुरक्षेत लक्षणीय वाढ होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech