गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित

0

गांधीनगर : वडोदरा आणि आणंदला जोडणाऱ्या ४० वर्षे जुन्या गंभीरा पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळल्याने आतापर्यंत १७ जणांचा बळी गेला आहे, ज्यात एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे.मृतांचा आकडा वाढत असताना, अजूनही ३ जण बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तर, या प्रकरणात आता ४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

बुधवारी (दि.९) सकाळी पाद्रा शहराजवळील गंभीरा गावाजवळ घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.या घटनेनंतर गुजरात सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलत रस्ते आणि इमारत विभागाच्या चार अभियंत्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारीच(दि.१०) या कारवाईचे आदेश दिले. अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने सरकारच्या भूमिकेचे कौतुक होत असले तरी, या दुर्घटनेमागे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

या घटनेत अनेक वाहने पुलासोबत नदीच्या खोल दलदलीत गडप झाली.यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलची (एसडीआरएफ) पथके अहोरात्र बचावकार्य करत आहेत, मात्र संततधार पाऊस आणि नदीतील खोल चिखल बचावकार्यात मोठे आव्हान निर्माण करत आहे. “पावसामुळे आणि दलदलीमुळे यंत्रसामग्रीचा वापर करणे कठीण झाले आहे,” असे वडोदराचे जिल्हा दंडाधिकारी अनिल धामेलिया यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech