गांधीनगर : गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूंचा तात्पुरता जामीन २१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. २०१३ च्या बलात्कार प्रकरणात गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूंना दोषी ठरवले होते आणि ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. ३ जुलै रोजी आसाराम बापूंच्या वकिलाने तात्पुरत्या जामिनाची आणखी मुदतवाढ मागणार नसल्याचे विधान केल्यानंतर उच्च न्यायालयाने आसाराम बापूंचा तात्पुरता जामिन एक महिन्यासाठी वाढवला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, वैद्यकीय कारणास्तव तात्पुरत्या जामिनाची मुदतवाढ देण्यासाठी पुढील अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती इलेश जे व्होरा आणि न्यायमूर्ती पीएम रावल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ३० जुलैच्या आदेशाबद्दल विचारणा केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या ३ जुलैच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. पण जर आसाराम बापूंची प्रकृती आणखी बिघडली तर ते पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात अशी सूट दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते की, जर याचिकाकर्त्याची प्रकृती आणखी बिघडली तर ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात. अशा परिस्थितीत३ जुलैचा आदेश त्यांच्या मार्गात येणार नाही. जर असे झाले आणि याचिकाकर्त्याने अर्ज केला तर आम्ही उच्च न्यायालयाला सुनावणी जलद करण्याची विनंती करतो.