चेन्नई : तामिळनाडू आणि पुडुचेरीत गेल्या २४ तासांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील अनेक शहरांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चेन्नईमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागानुसार, येत्या पुढील २४ तासांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. हे हवामान बदल अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळांमुळे झाले आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात प्रचंड पावसाची नोंद झाली आहे आणि समुद्रही प्रचंड खवळलेला आहे.भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने आधीच तामिळनाडूच्या किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला होता. स्थानिक हवामान खात्याच्या माहितीनुसार, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी सकाळी ८:३० वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी ५:३० वाजेपर्यंत कुड्डालोर – १७४ मिमी, पुडुचेरी – १४६.५ मिमी,कलावई – १०० मिमी, नेवेली – ९५ मिमी, चेन्नई – ८९ मिमी याशिवाय, मदुरै – ४१ मिमी, तिरुचिरापल्ली – २८ मिमी, सलेम – १८.९ मिमी या अंतर्गत जिल्ह्यांमध्येही हलक्याफुलक्या पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे तामिळनाडूमधील तलावांचे पाणीस्तर वाढले असून, चेन्नईमध्ये रात्रीच्या पावसामुळे झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मेट्टूर धरण सध्या त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाण्याने भरले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समीक्षा बैठक घेतली. त्यांनी अधिकार्यांना सतर्क राहण्याचे आणि मदत व बचाव कार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. चेन्नईमध्ये शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चेन्नईच्या जिल्हाधिकारी रश्मी सिद्धार्थ जगडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आयएमडीने पुढील २४ तासांत उत्तर किनारी तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे, विशेषतः बंगालच्या उपसागरात. हवामान खात्याचे संकेत असेही आहेत की, महिन्याच्या शेवटी आणखी एक लो प्रेशर एरिया तयार होऊ शकतो, जो चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे.