राज्यात अतिवृष्टीचा तडाखा; शेतकरी संकटात

0

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे थैमान पाहायला मिळत आहे. सांगली, सातारा, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगरसह अनेक भागांत शेतीत पाणी साचले असून बळीराजाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या अवकृपेने शेतकरी हताश झाले असून “कर्ज काढून पिकं घेतली, आता कसं जगायचं?” असा प्रश्न ते विचारत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात तब्बल दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून शासनाकडे १९१ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात कांदा पिके पाण्याखाली गेली आहेत, तर अहमदनगरच्या खडकी गावातील एका शेतकऱ्याने शेतातच पाण्यात बसून सरकारविरोधात शांततामय निषेध नोंदवला. यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यांतही पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूरच्या काटेजवळगा परिसरात एका व्यक्तीचा नदीच्या पाण्यात वाहून जाण्याचा दुर्दैवी प्रकार घडला.

मराठवाड्यातील अनेक भागांत २२ सप्टेंबर रोजीही पाऊस थांबलेला नाही. बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार शहरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आला असून शहरातील बाजारपेठा आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

धनेगाव येथील मांजरा धरणात वाढती पाण्याची आवक पाहता सहा वक्री दरवाजे उघडून १७,३३३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धाराशिवच्या भूम आणि परांडा तालुक्यांत चांदणी नदीने रौद्ररूप धारण केल्याने गावांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरगुती वस्तूंसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंडा तालुक्यातील शिरसाव परिसरात नदीला महापूर आल्यामुळे जवळपास २०० ते ३०० लोक नदीपलीकडे अडकले आहेत.

कृषिमंत्र्यांनी “या परिस्थितीत शेतकऱ्यांची अजिबात चूक नाही, हे निसर्गाचे संकट आहे,” असे म्हटले आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसानाचे अचूक मूल्यांकन सुरू आहे. शेतकरी मात्र तातडीने मदतीची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. राज्यभरात अजूनही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. निसर्गाच्या या अवकृपेने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून तातडीची मदतच त्यांच्यासाठी दिलासा ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech