मुंबई : हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करुया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवुया, अशा आशयाचे ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सोबतच हिंदी सक्तीचा मोर्चा आणि शासन निर्णयाच्या होळी करण्याच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवणे आणि त्रिभाषा सूत्राचा राज्यात जोरदार विरोध केला जात आहे. सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाने रविवारी, २९ जून शाखा प्रमुखांची बैठक, तसेच ५ जुलैला मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
अधिक माहिती देताना राऊतांनी सांगितले की, हिंदी सक्तीचा सरकारी निर्णय, फडणवीसी आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. २९ जून रोजी रविवारी ३ वाजता ही होळी आझाद मैदानावर आयोजित करण्यात येईल. तसेचा ५ जुलै रोजी मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी शाखा प्रमुखांची एक बैठक होईल. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. २९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता शिवसेना भवन येथे ही बैठक होणार आहे.