नागपुरात ऐतिहासिक ‘बडग्या-मारबत’ उत्साहात

0

नागपूर : नागपुरातील १४५ वर्षांची परंपरा लाभलेला ‘बडग्या-मारबत’ हा पौराणिक, धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जाणारा उत्सव आज, शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नागपूरच्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळी मारबत आणि इतवारी भागातील नेहरू पुतळा येथून काळी मारबतची मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही मिरवणुका नेहरू पुतळा चौकात एकमेकांना भेटल्या. यावेळी हजारो लोक या सोहळ्याचे साक्षिदार बनलेत.

जगात फक्त नागपुरातच साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची सुरुवात १८८१ साली झाली होती. तेली समाजाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उत्सवामध्ये समाजातील वाईट प्रवृत्ती, रोगराई आणि अंधश्रद्धांचा निषेध करण्यासाठी ‘काळी मारबत’, तर चांगल्या मूल्यांचा स्वीकार करण्यासाठी ‘पिवळी मारबत’ तयार केली जाते. मिरवणुकीदरम्यान “ईडा पिडा, रोग राई, जादूटोना घेऊन जा रे मारबत” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.या उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र येऊन समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा व संकटांवर सामूहिक विरोध व्यक्त करतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव पार पडतो. नागपूरसह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून देखील नागरिक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात.

बडग्याचे ऐतिहासिक महत्त्व – : या उत्सवात ‘बडग्या’ नावाच्या आणखी एका पुतळ्याचे महत्त्व आहे. इतिहासानुसार भोसले घराण्यातील बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. तिच्या या कृतीचा निषेध म्हणून तिच्या पुतळ्याची मिरवणूक काढली जाते आणि नंतर त्याचे दहन केले जाते. तिच्या नवऱ्यानेही या कृतीला विरोध न केल्यामुळे त्याचाही पुतळा ‘बडग्या’ म्हणून तयार करण्यात येतो. यावर्षी लव्ह-जिहाद, अमेरिकेकडून लावण्यात आलेला टॅरिफ, पहलगाममध्ये हल्ला करणाऱे दहशतवादी आणि मतदार यादीतील गोंधळ असे बडगे तयार करण्यात आले होते.

उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भमहाभारत काळातील पुतना मावशीचा संदर्भ देत काही अभ्यासक काळी मारबत म्हणजे नाशकारी प्रवृत्तींचे प्रतीक, तर पिवळी मारबत म्हणजे रक्षण करणाऱ्या शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगतात. काहींच्या मते, इंग्रजांच्या काळात लोकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी पुण्यात जसे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले, त्याच धर्तीवर नागपुरात ‘मारबत’ उत्सव सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे, गणेशोत्सवापेक्षा ही परंपरा अधिक जुनी मानली जाते.या परंपरेच्या माध्यमातून नागपूरकरांनी सामाजिक संदेश देणारी आणि ऐक्याचे प्रतीक ठरलेली ही परंपरा आजतागायत जपली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech