नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रियेवर ‘मतांच्या चोरी’चे आरोप लावताना विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या ‘अयोग्य टीका’ आणि ‘वैयक्तिक हल्ल्यां’ची भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस) अधिकाऱ्यांच्या संघाने शुक्रवारी तीव्र शब्दांत निंदा केली आहे. ट्विटरवर (एक्स) केलेल्या एका पोस्टमध्ये आयएएस अधिकारी संघाने म्हंटले की, अशा प्रकारचे वैयक्तिक हल्ले हे अधिकृत कर्तव्यांशी संबंधित नसतात. आम्ही लोकसेवेतील प्रतिष्ठा आणि प्रामाणिकतेचे समर्थन करतो. एका प्रतिष्ठित लोकसेवकाच्या कुटुंबावर अयोग्य टीका करण्यात आल्याचे दुःख वाटत असल्याचे आयएएस संघाने म्हंटले. अशा कोणत्याही वैयक्तिक हल्ल्यांचा संघ तीव्र निषेध करतो, जे त्यांच्या अधिकृत जबाबदाऱ्यांशी संबंधित नाहीत. आयएएस संघाचे हे निवेदन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांना इंडी आघाडीच्या सरकारच्या स्थापनेनंतर कारवाईची धमकी दिल्यानंतर काही दिवसांनी आले आहे.
राहुल गांधी यांनी १८ ऑगस्ट रोजी बिहारच्या गया येथील सभेत विखारी टीका केली. तसेच आमचे सरकार आल्यावर कारवाई करू अशी धमकी देखील दिली. काँग्रेस नेत्यांचा हा आरोप मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना त्यांच्या ‘मत चोरी’च्या आरोपांबाबत साक्षांकित प्रतिज्ञापत्र (अफिडेव्हिट) ७ दिवसांत सादर करण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समोर आला. अन्यथा, हे आरोप निराधार समजले जातील, असे कुमार यांनी स्पष्ट केले होते.
राहुल गांधी यांच्या इशाऱ्यांनंतर आणि इतर विरोधी पक्षांच्या आरोपांनंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचे आयएएस अधिकारी संघाने सांगितले. कुमार यांच्या दोन्ही मुली आणि जावई सुद्धा सिव्हिल सर्व्हिसमध्ये आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या खासगीपणाचे रक्षण व्हावे अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली आहे. कुमार यांचे धाकटे भाऊ हे सुद्धा भारतीय महसूल सेवा (कस्टम्स आणि अप्रत्यक्ष कर विभाग) मध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत.