धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लागले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरणार – मुख्यमंत्री

0

मुंबई : मुंबईतील १ हजार ६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. त्यात १,१४९ मस्जिद, ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारा तसेच १४८ इतर ठिकाणांचा देखील समावेश आहे. यामुळे मुंबई आता पूर्णपणे भोंगेमुक्त झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी(दि.११) विधानसभेत सांगितले. यानंतरही जर कोणत्या धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विधानसभेर माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील १ हजार ६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि राज्यातील १,७५९ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत ३,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले. यानंतर जर कोणत्या धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. तक्रारकर्त्यास दंडाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याच्या सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू. तसेच याबाबत ध्वनीप्रदूषण विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरारीपथकही स्थापन करू असेही यावेळी फडणवीस म्हणाले. भोंगे काढल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच, दहीहंडी, गणेशोत्सवात तात्पुरते मंडप उभारले जातात. त्यांना परवानगी देताना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अनिल पाटील यांनी इतर भोंगे बंद झाले, पण रोज सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या भोंग्याचे काय, असा सवाल खा. संजय राऊत यांचे नाव न घेता केला. त्यावेळी आपली एकच अडचण आहे, ध्वनीप्रदूषणाचा कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाचा कायदा अद्याप व्हायचा आहे तो होईल तेव्हा त्यावर विचार करू, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech