येवला : तंत्रज्ञानाने जग अतिशय जवळ आले असून विद्यार्थी जगभरात जाऊन करिअर करत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत कराव्यात त्यातून विद्यार्थी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज अंदरसुल जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलींच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला.
यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड,ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, हुसेन शेख, वसंत पवार, सरपंच लता जानराव,उपसरपंच अमोल सोनवणे ,मकरंद सोनवणे, दत्ता निकम, दिपक लोणारी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सारथी, बार्टी, महाज्योती च्या माध्यमातून महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यामाध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण घ्यावे. अंदरसुल जिल्हा परिषदेच्या या शाळेतून विद्यार्थी शालेय जीवनापासूनच यासाठी तयारी करत आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद असून यामध्ये शिक्षकांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.
मुलींना शिक्षण मिळण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी अतिशय महत्वाचे कार्य केलं आहे. त्यामुळे आज मुली विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मुलींनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केल्या. या सोहळ्याप्रसंगी अंदरसुल जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी जपानी भाषेतून अनोख्या पद्धतीने मंत्री छगन भुजबळ यांचे स्वागत केले. तसेच या शाळेतील विद्यार्थिनींनी कोडिंग डिकोडिंग च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ऍप्लिकेशनचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीने २७ अंकी आकड्यांचे वाचन उपस्थितांसमोर केले. यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांचे कौतुक करत मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.