दहीहंडी उत्सवाला गालबोट; दोन गोविंदांचा मृत्यू, ३४८ जखमी

0

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मात्र, या जल्लोषाला यंदा दुर्दैवी गालबोट लागले. दहीहंडी पथकातील दोन तरुण गोविंदांचा मृत्यू झाला असून ३४८ हून अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. दोन गोविंदांचा मृत्यू झाला असून मुंबईतील मानखुर्द येथे ३२ वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी हा गोविंदा खाली पडून गंभीर जखमी झाला. शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत १४ वर्षीय रोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाला. कावीळ झालेल्या रोहनला टेम्पोमध्ये बसलेला असताना अचानक चक्कर आली. राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मुंबई-ठाण्यात शेकडो जखमीमध्ये मुंबईत एकट्यात ३१८ गोविंदा जखमी झाले आहेत. सकाळी १०.३० वाजेपर्यंत विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांमध्ये ३१८ गोविंदांवर उपचार झाले. यापैकी २९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर २४ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ९ वर्षांचा आर्यन यादव आणि २३ वर्षांचा श्रेयस चाळके या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ठाणे शहरात २२ गोविंदा जखमी, तर कल्याण-डोंबिवलीत ८ गोविंदांना दुखापत झाली. यात पाच वर्षांचा चिमुकला व नववीत शिकणाऱ्या एका मुलाचाही समावेश आहे.गंभीर जखमींना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अधिकृत आकडेवारी : सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०.३० वाजेपर्यंतची आकडेवारी : मुंबई शहर रुग्णालये : जखमी १३५; उपचार सुरू १६ (१ गंभीर); डिस्चार्ज ११९, पूर्व उपनगर रुग्णालये : जखमी ७२; उपचार सुरू २; डिस्चार्ज ७०, पश्चिम उपनगर रुग्णालये : जखमी १११; उपचार सुरू ६ (१ गंभीर); डिस्चार्ज १०५, एकूण : जखमी ३१८; उपचार सुरू २४; डिस्चार्ज २९४, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष, यंदा लाखोंच्या घरात बक्षिसांची घोषणा झाल्याने गोविंदा पथकांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून आली. मात्र, थर रचताना हेल्मेट, पॅड, जाळी अशा सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक गंभीर अपघात झाले. दहीहंडी हा एक साहसी उत्सव असला, तरी जीव धोक्यात घालून तो साजरा करणे योग्य नाही, हे यंदाच्या घटनांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech