‘इंडी’ आघाडीच्या खासदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला – श्रीकांत शिंदे

0

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडि आघाडीची मते फुटल्यानंतर शिवसेना खासदार व एनडीए उमेदवार प्रतिनिधी असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसचे यात्रेकरु खासदार राहुल गांधीं यांच्यावर निशाणा साधला. गांधी यांच्या आवाहनानुसार इंडि आघाडीच्या खासदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडि आघाडीमध्ये फाटाफूट झाली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली. तर इंडि आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत विरोधकांची मते फुटली.

यावरुन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा, असं आवाहन राहुल गांधीं यांनी इंडि आघाडीच्या खासदारांना केलं होतं. ‘इंडि’ आघाडीच्या खासदारांनी खरोखरच त्यांचं ऐकलं! अंतरात्म्याच्या आवाजाला जागून त्यांच्यापैकीच अनेकांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत सी.पी राधाकृष्णनजींच्याच पारड्यात टाकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशीरा का होईना कळू लागलंय, असे खासदार डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे. एनडीएला मतदान करणाऱ्या इंडी आघाडीच्या खासदारांचे खासदार डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी यांनी १० वर्ष केलेले काम, ऑपरेशन सिंदूर, केंद्र सरकारची धोरणे यामुळे एनडीए खासदारांबरोबरच विरोधी खासदार देखील प्रभावित झाले. त्यामुळेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या खासदारांनी मतदान केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवार प्रतिनिधी म्हणून जबाबदार सांभाळली होती. मतांची जुळवाजुळव आणि विजयी रणनितीमध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा सहभाग होता. एनडीए उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षाही जास्त मते मिळाल्याने एनडीएची भक्कम एकजूट कायम असल्याचे दिसून आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech