नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यात नवी दिल्लीमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात सिंगापूरसोबत भारताचे सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “सिंगापूर आमचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. आपले संरक्षणसंबंध सतत बळकट होत आहेत. आज आपण भविष्यासाठी भागीदारीचा एक सविस्तर रोडमॅप तयार केला आहे. बदलत्या काळानुसार, अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल न्युक्लिअर, अर्बन वॉटर मॅनेजमेंटसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र काम करू.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत-सिंगापूर संबंधांमध्ये भारतीय राज्यांचीही मोठी भूमिका असेल. जानेवारीमध्ये जेव्हा सिंगापूरचे राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी ओडिशालाही भेट दिली होती. गेल्या वर्षी झालेल्या सेमिकंडक्टर कराराच्या माध्यमातून रिसर्च क्षेत्रालाही चालना देण्यात आली आहे. चेन्नईमध्ये सिंगापूरचे एक नवीन सेंटर स्थापन करण्याचे काम सुरू आहे. हे सेंटर कुशल मनुष्यबळ (स्किल्ड मॅनपॉवर) तयार करेल. आपल्या सहकार्याचा विस्तार एआय आणि इतर डिजिटल क्षेत्रात केला जाणार आहे. आम्ही ठरवले आहे की आपल्या तरुणांच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी ‘इंडिया-सिंगापूर हॅकाथॉन’ चे आयोजन केले जाईल.
आज ग्रीन आणि डिजिटल शिपिंग क्षेत्रात झालेल्या करारामुळे डिजिटल पोर्ट क्लिअरन्सला चालना मिळेल. भारत आपल्या बंदरांच्या विकासासाठी जलद गतीने काम करत आहे. आज आपण सिंगापूरच्या कंपनीने विकसित केलेल्या ‘भारत-मुंबई कंटेनर टर्मिनल’ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे.आतंकवादाबाबत आमच्या चिंता समान आहेत. आम्हाला वाटते की आतंकवादाविरुद्ध एकत्र लढणे ही काळाची गरज आहे. या लढाईत सिंगापूर सरकारने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपले नाते केवळ राजनैतिक मर्यादांपुरते मर्यादित नसून, त्याही पुढे गेल्याचे मोदी यांनी सांगितले.