भारत-रशिया संबंधांमध्ये तणावाची शक्यता भारताने फेटाळली

0

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांचे संबंध स्थिर असून वेळेच्या कसोटीवर उतरलेले भागीदारीचे उदाहरण आहेत, असे विधान करत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीव्र टीकेवर भारत-रशिया संबंधांमध्ये कुठलाही तणाव असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी शुक्रवारी (दि.१) माध्यमांशी बोलताना सांगितले कि, “विविध देशांसोबत आमचे द्विपक्षीय संबंध हे आमच्या स्वतःच्या अटींवर आधारित असतात आणि त्यांना तिसऱ्या देशाच्या नजरेतून पाहू नये.” पुढे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की भारत आणि रशिया यांचे संबंध स्थिर असून वेळेच्या कसोटीवर उतरलेले भागीदारीचे उदाहरण आहेत. संरक्षण सहकार्याबाबत विचारले असता जायसवाल म्हणाले, “आमच्या संरक्षण गरजा पूर्णपणे राष्ट्रीय सुरक्षेच्या आवश्यकता आणि आमच्या रणनीतिक मूल्यांकनावर आधारित असतात.”

भारत-अमेरिका संबंधांबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांच्या भागीदारीने अनेक बदल आणि आव्हानांचा सामना केला आहे. ट्रम्प यांच्या “डेड इकॉनॉमी” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जायसवाल म्हणाले, “भारत आणि अमेरिका ज्या ठोस अजेंड्यावर काम करत आहेत, त्यावरच आमचे लक्ष आहे. आम्हाला विश्वास आहे की अमेरिका सोबतचे आमचे संबंध पुढेही वृद्धिंगत होतील. भारत-अमेरिका संबंध हे सामायिक हितसंबंध, लोकशाही मूल्ये आणि लोकांमधील सशक्त संबंधांवर आधारित व्यापक जागतिक रणनीतिक भागीदारी आहेत.”

इराणसोबत व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर जायसवाल म्हणाले, “आम्ही या निर्बंधांची नोंद घेतली आहे, आणि यावर विचार करत आहोत.” तसेच त्यांनी त्या अहवालांवरही प्रतिक्रिया दिली ज्यात म्हटले होते की भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेलाचा पुरवठा थांबवला आहे. त्यांनी सांगितले, “ऊर्जेच्या गरजांबाबत आमचा दृष्टिकोन सर्वांनाच माहीत आहे. आम्ही बाजारातील उपलब्ध स्रोत आणि सध्याची जागतिक परिस्थिती यावर लक्ष ठेवून आहोत. काही विशिष्ट गोष्टींबाबत आमच्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही.” अलीकडील काही महिन्यांमध्ये रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार ठरलेला आहे. भारताच्या एकूण आयातीपैकी रशियाचा हिस्सा सुमारे ३५–४० टक्के इतका आहे, जो युक्रेन युद्धापूर्वी फक्त ०.२ टक्के होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech