लखनऊ : भारत आणि मॉरिशस वेगवेगळे देश असले तरी आपले स्वप्न एकसारखे आहेत. भारत आणि मॉरिशस केवळ भागीदार नाहीत तर एक कुटुंब आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी वाराणसीमध्ये मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्याशी द्विपक्षीय बैठकीनंतर सांगितले. पंतप्रधान मोदींनी मॉरिशसला भारताच्या “नेबरहूड फर्स्ट” धोरणाचा आणि “व्हिजन सागर” या संकल्पनेचा एक महत्त्वाचा स्तंभ असल्याचे सांगितले. त्यांनी मॉरिशससाठी एका विशेष आर्थिक पॅकेजची घोषणाही केली.
पंतप्रधान मोदींनी काशीला भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “शतकांपूर्वी भारतीय संस्कृती मॉरिशसपर्यंत पोहोचली आणि तिथल्या जीवनप्रवाहात एकरूप झाली. जसं गंगेचा अविरत प्रवाह असतो, तसंच भारतीय संस्कृतीचा प्रवाहही मॉरिशसला सतत समृद्ध करत राहिला आहे.” पंतप्रधान रामगुलाम यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल मोदी म्हणाले की, ही भेट केवळ औपचारिक नाही, तर एक आत्मीय मिलन आहे. मी अभिमानाने सांगतो की भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नसून, एक कुटुंब आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, “मॉरिशस हे भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाचा आणि ‘व्हिजन सागर’ या दृष्टिकोनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.”
चागोस कराराच्या यशस्वी पूर्णतेबद्दल पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक यशाला त्यांच्या सार्वभौमत्वाची एक महत्त्वपूर्ण विजय म्हणून संबोधले. त्यांनी सांगितले की, “भारत नेहमीच मॉरिशसच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.” पंतप्रधान मोदींनी मार्च महिन्यात मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस समारंभात सहभाग घेतल्याचे स्मरण करून दिले. त्यावेळी दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना ‘एन्हान्स्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ म्हणजेच विकसित धोरणात्मक भागीदारीचा दर्जा दिला होता. आजच्या बैठकीत दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रादेशिक व जागतिक विषयांवर विचारविनिमय केला.
मॉरिशसच्या गरजा लक्षात घेता, पंतप्रधान मोदींनी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्यांनी सांगितले की हे पॅकेज इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार निर्मिती आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांना बळकट करेल. या पॅकेजमध्ये भारताबाहेर पहिल्या जन औषधी केंद्राची स्थापना,आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणे, रुग्णालये आणि शाळांमध्ये विविध सहकार्य. या माध्यमातून दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ होईल आणि मॉरिशसच्या विकासासाठी भारताचा सक्रिय सहभाग असेल, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.