नवी दिल्ली : भारताने चीनसोबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला तणाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टाकले आहे. भारत सरकारने चीनी नागरिकांसाठी ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा टूरिस्ट व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली असून २४ जुलै २०२५ पासून चिनी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्यास सुरूवात होणार आहे. बिजिंगमधील भारतीय दूतावासाने बुधवारी(दि.२३) या निर्णयाची माहिती दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यांनी या निर्णयाबद्दलची घोषणा केली. बीजिंगमधील भारतीय दूतावासाने संबंधित नोटीस जारी केली आहे. यामध्ये व्हिसासाठी लागणाऱ्या कागपत्रांची माहिती देण्यात आली आहे.
व्हिसा केंद्रात पार्सपोर्टसाठी अर्ज करताना, पासपोर्ट विथड्रॉवल लेटर आवश्यक असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. तसेच व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना हा व्हिसा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र सामान्य प्रवासावर अजूनही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोविड-१९ चीनमधून पसरला होता. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामुळे दोन्ही देशांतील पर्यटन संबंध पूर्णत: थांबले होते. आता ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
भारतीय दूतावासाने जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “२४ जुलै २०२५ पासून चीनी नागरिक भारतात येण्यासाठी पर्यटक व्हिसासाठी अर्ज करू शकतात. त्यांना सर्वप्रथम वेब लिंकवर जाऊन ऑनलाइन व्हिसा अर्जपत्र भरावे लागेल, त्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढावा लागेल, आणि त्याच वेब लिंकवर अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. भारतीय व्हिसा अर्ज केंद्रावर जाऊन हा प्रिंटआउट घेतलेला अर्ज जमा करावा लागेल. व्हिसा अर्जासोबत पासपोर्ट आणि इतर संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल.
”भारत आणि चीनच्या राजनैतिक आणि लष्करी चर्चामध्ये दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यावर भर दिला जात आहे. दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू असून, परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला दोन्ही देशांनी हवाई वाहतूक सुरू करणे, व्हिसा देणे आणि भारतीय यात्रेकरूंना कैलास मानसरोवर यात्रेसाठी परवानगी देणे यासंदर्भात चर्चा करून मान्यता दिली. दोन्ही देशांनी संबंध पूर्ववत करण्यावर जोर दिला असून, त्याच अनुषंगाने आता भारताने व्हिसा बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.