नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील कर अचानक वाढवल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) आयोजित कार्यक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत, भारताने आता निर्यात वाढवण्यावर आणि आयात कमी करण्यावर भर द्यावा, असे ठाम मत व्यक्त केले.
“जगात जे देश दादागिरी करत आहेत, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असून त्यांच्या हातात प्रगत तंत्रज्ञान आहे. आपल्याला जर ‘विश्वगुरू’ व्हायचं असेल, तर अर्थव्यवस्था बळकट करत निर्यातीतून शक्ती प्राप्त करावी लागेल, असे गडकरी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, आपण कोणावर दादागिरी करणार नाही, कारण आपल्या संस्कृतीत ‘वसुधैव कुटुंबकम्’ हेच मूल्य आहे. मात्र, आपल्याला कोणासमोर हात पसरावा लागू नये, यासाठी आपली निर्यात आणि आर्थिक घडी भक्कम असावी.”गडकरी यांनी संशोधन संस्थांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रात नवकल्पनांवर काम करावे, असे आवाहनही यावेळी केले. “विज्ञान आणि तंत्रज्ञानच आपल्या देशातील समस्यांवर उपाय काढू शकतात असेही त्यांनी सांगितले.