नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पीओकेमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने सुरू असून आज, शुक्रवारी या निदर्शनांचा चौथा दिवस होता. पीओकेमधील परिस्थिती सध्या भयानक असून पाकिस्तान सरकारने लष्कराला पाचारण केले आहे. दरम्यान पीओकेमधील या परिस्थितीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेले निदर्शने हे पाकिस्तानच्या दडपशाहीचे आणि संघटित लूटमारीचे झालेले परिणाम आहेत.
पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पीओकेमधील अनेक भागात निदर्शने आणि पाकिस्तानी सैन्याने निष्पाप नागरिकांवर केलेल्या क्रूरतेचे वृत्त आम्ही पाहिले आहे. आम्हाला वाटते की, हे पाकिस्तानच्या दडपशाहीच्या दृष्टिकोनाचे तसेच जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे व्यापलेल्या प्रदेशातील संसाधनांच्या पद्धतशीर लूटमारीचे परिणाम आहे. पाकिस्तानला त्याच्या भयानक मानवी हक्क उल्लंघनांसाठी जबाबदार धरले पाहिजे, असे जयस्वाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधील लोक गेल्या काही दिवसांपासून शाहबाज सरकार आणि असीम मुनीरच्या सैन्याविरुद्ध निदर्शने करत आहेत. अवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. मुझफ्फराबाद, मीरपूर, कोटली, रावळकोट आणि नीलम व्हॅलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. पीओकेमधील निदर्शने पाकिस्तानच्या इतर भागात पसरली आहेत. ती बळजबरीने दडपली जात आहेत. निदर्शनांदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.