चामडे, पादत्राणे, कापड, खेळणी, रत्ने, दागिन्यांवरील निर्यात कर होणार रद्द – १२० अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापार पोहोचवण्याचे उद्दिष्ट
नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार (एफटीए) झाला आहे. गुरुवारी लंडनमध्ये पंतप्रधान मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या उपस्थितीत या महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये या अनुषंगाने तीन वर्षांपासून चर्चा सुरू होती. या करारानुसार, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून १२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे एफटीएचे उद्दिष्ट आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे भारतातून युकेमध्ये होणारे चामडे, पादत्राणे, कापड, खेळणी, रत्ने आणि दागिने यांसारख्या श्रम-केंद्रित उत्पादनांवरील निर्यात कर रद्द केले जाणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे देखील युके दौऱ्यावर आहेत. एफटीएशी संबंधित वाटाघाटींमध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे.
यापूर्वी, दोन्ही देशांमध्ये ६ मे रोजी हा करार अंतिम झाला होता. त्यानुसार भारत आणि ब्रिटनमधील या एफटीएला भारतीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आता तो ब्रिटिश संसदेकडून मंजुरीसाठी प्रलंबित आहे. यासाठी ६ महिने ते १ वर्ष लागू शकते. आज झालेल्या करारानंतर उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी या कराराला ऐतिहासिक म्हणत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, जेव्हा भारत आणि ब्रिटन एकमेकांना भेटतात आणि तेही कसोटी मालिकेदरम्यान, तेव्हा क्रिकेटचा उल्लेख करायलाच हवा. क्रिकेट हा दोन्ही देशांसाठी फक्त एक खेळ नाही. तो एक आवड आहे. आम्ही दोन्ही देशांमधील उच्च धावसंख्येच्या भागीदारी करण्यात गुंतलो आहोत.
याआधी, पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी असेही म्हटले होते की, ७० हजार कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणूक आणि व्यवसाय करारांना मान्यता देण्यात आली आहे. स्टार्मर पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच ब्रिटन दौरा आहे. या करारामुळे भारतातून ब्रिटनला होणाऱ्या ९९ टक्के निर्यातीवरील आयात शुल्कात सवलत मिळेल. याचा अर्थ असा की, भारतातून ब्रिटनला पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कर एकतर लक्षणीयरीत्या कमी केला जाईल किंवा पूर्णपणे काढून टाकला जाईल. त्याचबरोबर, हा करार ब्रिटिश कंपन्यांसाठी देखील फायदेशीर ठरेल. आता त्यांना भारतात व्हिस्की, कार आणि इतर उत्पादने विकणे सोपे होईल.
भारत या उत्पादनांवरील कर १५ वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार दरवर्षी सुमारे ३ लाख कोटी रुपयांनी वाढू शकतो. दोन्ही देशांमधील करारामुळे जग्वार, लँड रोव्हरसारख्या ब्रिटिश लक्झरी कार, इंग्लंडमधून येणाऱ्या दारू आणि वाइन, यूकेमधील ब्रँडेड कपडे, फॅशन उत्पादने आणि घरगुती वस्तू, यूकेमधून आयात होणारे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक यंत्रसामग्री, भारतीय रत्ने आणि दागिने यूकेमध्ये स्वस्त दरात निर्यात होऊ शकते. ज्यामुळे यूकेमधील भारतीय ग्राहकांसाठी उत्पादने स्वस्त होऊ शकतात.
दरम्यान स्कॉच व्हिस्की असोसिएशनचे सीईओ मार्क केंट यांनी या कराराचे वर्णन ‘परिवर्तनकारी’ असे केले, ते म्हणाले, “यूके-भारत मुक्त व्यापार करार हा पिढीजात एकदाच होणारा करार आहे आणि जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की बाजारपेठेत स्कॉच व्हिस्कीच्या निर्यातीसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.” या करारामुळे भारतीय निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगारही निर्माण होतील. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताने १२.९ अब्ज डॉलर्स किंवा १.१२ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात ब्रिटनला केली. या करारामुळे २०३० पर्यंत भारताला १ ट्रिलियन डॉलर्सचे निर्यात लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल. विकसित बाजारपेठांमध्ये प्रवेश देखील वाढेल. भारत आणि ब्रिटनमधील कराराबद्दल वाटाघाटी १३ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाल्या, ज्या आता सुमारे ३.५ वर्षांनी पूर्णत्वास गेल्या आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी दोन्ही देशांमधील प्रस्तावित एफटीएसाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. २०१४ पासून, भारताने मॉरिशस, युएई, ऑस्ट्रेलिया आणि ईएफटीए (युरोपियन मुक्त व्यापार संघटना) सोबत अशा ३ मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी केली आहे. भारत युरोपियन युनियन (ईयू) सोबत अशाच प्रकारच्या करारांवर सक्रियपणे वाटाघाटी करत आहे.