नवी दिल्ली : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी भारताला अमेरिकेतून अणु हल्ल्याची धमकी दिली. या धमकीला आता भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अशा धमक्यांपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट करत मुनीर यांच्या विधानाला बेजबाबदार म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हंटल आहे कि, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दिलेल्या तथाकथित वक्तव्यांची आम्ही नोंद घेतली आहे. अण्वस्त्रांची धमकी देणे ही पाकिस्तानची सवय बनली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय अशा वक्तव्यांमध्ये असलेल्या गैरजबाबदारीबाबत स्वतःचे निष्कर्ष काढू शकतो.परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, “मुनीर यांचे विधान अशा देशातील अण्वस्त्र नियंत्रण आणि कमांडच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते, जिथे लष्कराचे संबंध दहशतवादी संघटनांशी आहेत. हेही खेदजनक आहे की ही विधाने एखाद्या मित्र देशाच्या भूमीवरून करण्यात आली आहेत.
भारताने यापूर्वीच स्पष्ट सांगितले आहे की, तो अण्वस्त्रांच्या धमक्यांसमोर कधीही झुकणार नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहू.” भारत सरकारच्या सूत्रांनी म्हटले की, ज्यावेळी अमेरिका पाकिस्तानी सैन्यासोबत उभी राहते तेव्हा तेथील सैन्य आपला आक्रमक चेहरा दाखवू लागते. यावेळीही अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी उघडपणे धमकी दिली आहे. येणाऱ्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये सत्तापालट होऊ शकते. असीम मुनीर पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात.पाकिस्तानमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याचे भारतीय सरकारी सूत्रांचे मत आहे. ही शस्त्रे दहशतवादी आणि बेजबाबदार लोकांच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे भारताविरोधात गरळ ओकता-ओकता त्यांच्या मुखातून पुन्हा एकदा सत्य बाहेर पडले आहे. भारत एक चकचकित मर्सिडिज, तर पाकिस्तान कचरा वाहून नेणारा डंपिंग ट्रक आहे, असे म्हणत असीम मुनीर यांनी पाकिस्तानची आब्रू पार जगाच्या वेशीवर टांगली आहे. ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टॅम्पा येथे एका ब्लॅक टाय डिनर पार्टीला उपस्थित होते. पाकिस्तानी व्यापारी अदनान असद यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना मुनीर यांनी अमेरिकेत आपली भडसा काढली.भारताला धमकी देताना मुनीर म्हणाले, जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर पाकिस्तान अर्ध्या जगाला आपल्या सोबत घेऊन बुडेल.