हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने

0

संरक्षण मंत्रालयाने एचएएलशी केला ६२,३७० कोटींचा करार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) भारतीय हवाई दलासाठी ९७ एलसीए मार्क-1ए लढाऊ विमानांची ऑर्डर दिली आहे. ६२,३७० कोटी रुपयांच्या या करारात ६८ लढाऊ आणि २९ ट्विन-सीटर विमाने खरेदी केली जाणार आहेत. स्वदेशी लष्करी हार्डवेअरसाठी ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. कारण ८३ एलसीए मार्क-1 ए विमानांसाठी मागील ऑर्डर ४८ हजार कोटी रुपयांची होती.

संरक्षण मंत्रालयाने नवी दिल्लीत एचएएल सोबत ९७ एलसीए एमके-1ए विमाने आणि भारतीय हवाई दलासाठी संबंधित उपकरणांसाठी ६२,३७० कोटी रुपयांचा करार केला. या करारात ६८ लढाऊ आणि २९ ट्विन-सीटर विमाने खरेदी केली जातील. अपग्रेड केलेल्या एलसीए एमके-1A मध्ये प्रगत एईएसए रडार, स्व-संरक्षण ढाल आणि नियंत्रण अ‍ॅक्च्युएटर्स, ६४ टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आणि ६७ नवीन स्वदेशी उपकरणे असतील. या प्रकल्पामुळे सहा वर्षांत दरवर्षी ११,७५० रोजगार निर्माण होतील. या विमानांची डिलिव्हरी २०२७-२८ मध्ये सुरू होईल, ज्यामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता, स्वावलंबी भारत आणि भारताची संरक्षण तयारी मजबूत होईल.

भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस मार्क-1ए लढाऊ विमानांचा करार ३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंगळुरू येथे एअरो इंडिया दरम्यान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत करण्यात आला होता. यामध्ये ७३ लढाऊ विमाने आणि १० प्रशिक्षण विमाने असतील. एएएलने गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी या करारातील पहिले ट्विन-सीटर प्रशिक्षण विमान हवाई दलाला दिले. हवाई दलाच्या गरजांना प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने दीर्घ प्रतीक्षेनंतर गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी ९७ तेजस एमके-1ए खरेदी करण्यास मान्यता दिली. एचएल सोबत अतिरिक्त ९७ तेजस एमके-1ए साठी करार झाल्यानंतर एकूण १८० विमाने तयार केली जातील. एचएलने ८३ विमानांसाठी ऑर्डर मिळाल्यावर दरवर्षी १६ जेट विमाने तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण आता ९७ विमानांसाठी अतिरिक्त ऑर्डर मिळाल्यावर दरवर्षी ३२ जेट विमाने तयार करण्याची तयारी करत आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या मते, हा एलसीए तेजस कार्यक्रम भारतीय हवाई दलाला त्यांच्या मिग-२१, मिग-२३ आणि मिग-२७ च्या ताफ्याची जागा घेण्यास मदत करणार आहे. ६२ वर्षे देशाची सेवा करणारे लढाऊ विमान मिग-२१ २६ सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या हवाई ताफ्यातून निवृत्त होण्याच्या एक दिवस आधी स्वाक्षरी केलेला हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मिग-२१ विमानांच्या निवृत्तीनंतर हवाई दलाकडे आवश्यक असलेल्या ४२ ऐवजी २९ लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रन शिल्लक राहतील. त्यामुळे कमी झालेल्या स्क्वॉड्रनची ताकद नवीन एलसीए तेजस एमके-१ आणि एमके-२ विमानांच्या समावेशाने भरून काढली जाईल. स्वदेशी बनावटीचे एलसीए तेजस विमान मिग-२१ ची जागा घेऊन हवाई दलाला बळकटी देईल. मिग-२१ च्या प्रस्थानामुळे रशियन विमानांच्या युगाचा अंत झाला आहे. पण त्याचा वारसा कायमचा टिकून राहणार आहे.

हवाई दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित केलेल्या एलसीए तेजस एमके-१ए लढाऊ विमानात एव्हियोनिक्स, शस्त्रे आणि देखभालीमध्ये ४३ सुधारणा करण्यात आल्या आहेत. एचएएलच्या मते, तेजस एमके-१ए मध्ये आता अत्याधुनिक एईएसए रडार असेल, जो तेजस एमके-१ च्या इस्रायली ईएल/एम-२०३२ रडारपेक्षा श्रेष्ठ असेल. पहिल्या बॅचमध्ये इस्रायली ईएल/एम-२०५२ रडार असेल, तर उर्वरित बॅचमध्ये स्वदेशी रडार असेल. तेजस एमके-१ए मध्ये इस्रायली ईएल/एम-८२२२ जॅमर पॉड देखील असेल. जो बीव्हीआर किंवा एसएएम क्षेपणास्त्रांच्या रडार सिग्नलमध्ये व्यत्यय आणेल. आधुनिक हवाई युद्धासाठी ही सुधारणा महत्त्वाची आहे. तेजस एमके-१ए मध्ये प्रगत क्लोज-रेंज, बीव्हीआर आणि लांब पल्ल्याच्या बीव्हीआर क्षेपणास्त्रे असतील. हवेतून जमिनीवर हल्ला करण्यासाठी ते ५०० किलो एलजीबी आणि अनगाइडेड बॉम्ब देखील वाहून नेणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech