भारतीय सशस्त्र दलांचे पथक झपाद २०२५ सरावात होणार सहभागी

0

नवी दिल्ली : रशियामध्ये येत्या १० ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित झपाद २०२५ या बहुपक्षीय संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांतील ६५ जणांचे पथक आज रशियातील निझनीय येथील मुलीनो प्रशिक्षण तळाकडे रवाना झाले. भारतीय पथकात भारतीय सशस्त्र दलाचे ५७ सैनिक, भारतीय हवाई दलाचे ०७ सैनिक आणि भारतीय नौदलातील एक कर्मचारी यांचा समावेश आहे. कुमाऊ रेजिमेंटची तुकडी आणि इतर शाखा तसेच सेवांच्या तुकड्या भारतीय सेनेच्या पथकाचे नेतृत्व करत आहेत. लष्करी सहकार्यात वाढ करणे, आंतर- परिचालन क्षमता सुधारणे आणि पारंपरिक युद्धनीती तसेच दहशतवाद विरोधी मोहिमांच्या क्षेत्रात डावपेच, युध्दतंत्रे आणि पद्धती यांची देवाणघेवाण करण्यासाठी सरावात सहभागी सैन्यांना मंच उपलब्ध करून देणे हा बहुपक्षीय सराव झपाद २०२५ च्या आयोजनाचा उद्देश आहे.

सदर सरावादरम्यान खुल्या आणि समतल भागात कंपनी स्तरावरील संयुक्त कृतींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, यात सहभागी सैन्यांच्या तुकड्या संयुक्त नियोजन, डावपेचांचा सराव आणि विशेष शस्त्रे चालवण्याची कौशल्ये आत्मसात करणे यांसारख्या मोहिमा हाती घेतील. संयुक्त परिचालनात्मक क्षमता अधिक धारदार करण्याची, उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा समावेश करून घेण्याची तसेच बहुराष्ट्रीय लढाऊ वातावरणात काम करण्याची अनमोल संधी हा सराव उपलब्ध करून देईल. झपाद २०२५ लष्करी सरावातील सहभागामुळे भारत आणि रशिया या देशांतील संरक्षण संबंधी सहकार्य अधिक बळकट होईल आणि त्यांच्यातील मैत्रीला अधिक चालना मिळेल आणि त्यायोगे सहयोग आणि परस्पर विश्वासाची भावना दृढ होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech