शेख हसीनांच्या सत्तापालटानंतर पहिलाच भारतीय दौरा
नवी दिल्ली : शेख हसीना यांची सरकार उलथवून टाकल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता दोन्ही देश निर्माण तणाव कमी करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.याच अनुषंगाने, भारत आणि बांगलादेश यांच्यात सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतची द्वैवार्षिक बैठक या महिन्याच्या अखेरीस ढाका येथे होणार आहे. शेख हसीना यांच्या सरकारच्या उलथापालथीनंतर भारतीय शिष्टमंडळाचा हा पहिलाच ढाका दौरा असेल. ही ५६ वी डायरेक्टर जनरल (डीजी) स्तरावरील सीमा चर्चा असेल, जी २५ ते २८ ऑगस्ट दरम्यान बांगलादेशच्या सीमा रक्षक दलाच्या (बीजीबी) मुख्यालय पीलखाना येथे होणार आहे.
भारताची सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि बांगलादेशचा बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) यांच्यातील ही बैठक दोन्ही देशांमधील ४,०९६ किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या सीमेमध्ये भारतातील पाच राज्यांचा समावेश होतो. पश्चिम बंगाल (२,२१७ किमी), त्रिपुरा (८५६ किमी), मेघालय (४४३ किमी), आसाम (२६२ किमी) आणि मिझोराम (३१८ किमी). बीएसएफला या संपूर्ण सीमाभागाची सुरक्षा आणि गुप्तचर माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे.
एका अधिकृत सूत्रानुसार, ही बैठक आधी जुलैमध्ये होणार होती, परंतु प्रशासनिक कारणास्तव ती ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व बीएसएफचे महानिदेशक दलजीत सिंग चौधरी करणार आहेत. बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बैठकीत सीमाभागातील विविध गुन्हेगारी घटनांवर, विशेषतः अवैध घुसखोरीवर सविस्तर चर्चा होईल. बीएसएफ बीजीबीला याबाबत माहिती देईल की त्याने आपल्या सीमांवर तैनात जवानांना सुमारे ५,००० बॉडी-वॉर्न कॅमेरे दिले आहेत. हे कॅमेरे सीमा भागात बीएसएफ कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि इतर बेकायदेशीर क्रिया रेकॉर्ड करतील, जेणेकरून त्यावर ठोस कारवाई करता येईल.
फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये झालेल्या मागील बैठकीत दोन्ही देशांनी “सेकंड-इन-कमांड” (अतिरिक्त महासंचालक) स्तरावर नवीन संपर्क प्रणाली निर्माण करण्याचा आणि सीमा भागात ९९ नवीन ठिकाणी कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, या सीमापैकी सुमारे ८६४.४८ किलोमीटर भाग अजूनही कुंपणाशिवाय आहे, यातील १७४.५१ किलोमीटर भूगोलिक कारणांमुळे कुंपण घालता येणे अशक्य आहे. बीएसएफ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार कार्यरत असल्यामुळे या बैठकीत कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांनी नुकतीच घोषणा केली की देशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होतील. ही घोषणा शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारच्या ५ ऑगस्ट २०२४ रोजी सत्तेतून हटल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आली. भारत आणि बांगलादेश यांच्यात डीजी स्तरावरील सीमा चर्चा १९७५ ते १९९२ दरम्यान दरवर्षी होत होती. मात्र, १९९३ पासून ती द्वैवार्षिक करण्यात आली असून, ही चर्चा एकदा दिल्ली आणि एकदा ढाका येथे आलटून-पालटून आयोजित केली जाते. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेली मागील चर्चा दिल्लीमध्ये झाली होती, जिथे बीजीबी च्या शिष्टमंडळाने भारत दौरा केला होता.