पालघर : मासेमारी करताना चुकून राष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्यामुळे भारत-पाकिस्तानच्या समुद्री सुरक्षा यंत्रणांनी अनेक मच्छीमारांना अटक करून तुरुंगात डांबले होते. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार अलीकडे भारताने पाकिस्तानमधील १९ कैद्यांना सोडले. त्यांना अटारी-वाघा मार्गे पाकिस्तानकडे पाठवण्यात आले. तरीदेखील पाकिस्तानच्या तुरुंगात अजूनही भारतातील १९३ मच्छीमार आहेत, यामध्ये पालघर जिल्ह्यातील एक खलाशीही सामील असून त्याच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे.
करारानुसार कैद्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतर एका महिन्याच्या आत सुटका करणे बंधनकारक आहे. मात्र पाकिस्तानने गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतीय मच्छीमारांना सोडलेले नाही. यामुळे कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात येतो. तुरुंगात असलेल्या मच्छीमारांची आरोग्यस्थिती चिंताजनक असून अनेक मानसिक तणावाखाली आहेत.
कराची येथील मलीर तुरुंगात भारतातील गुजरात, महाराष्ट्रातील डहाणू-तलासरीतील १८ मच्छीमारांसह शेकडो कैदी वर्षानुवर्षे कैद आहेत. गेल्या वर्षी गुजरातमधील एका मच्छीमाराने तुरुंगात आत्महत्या केली, तर विनोद कोल या पालघरमधील खलाशाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर उर्वरित मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे व वातावरण आहे. भारतीय मच्छीमारांच्या तातडीच्या सुटकेसाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून जोर धरू लागली आहे.