मुंबई : भारतात रचना आणि निर्मिती केलेली भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका (एसव्हीएल) आयएनएस संधायक’ने १६ ते १९ जुलै दरम्यान हायड्रोग्राफिक सहकार्यासाठी मलेशियातील पोर्ट क्लांग येथे भेट देऊन आपला पहिला बंदर दौरा केला. या भेटीतून भारतीय नौदल हायड्रोग्राफिक विभाग (आयएनएचडी) आणि राष्ट्रीय हायड्रोग्राफिक कार्यालय प्रारुपांतर्गत प्रादेशिक हायड्रोग्राफिक क्षमता उभारणीतील भारताची व्यापक भूमिका अधोरेखित होते.
भारतात रचना आणि निर्मिती केलेल्या संधायक श्रेणीतील हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाजांपैकी पहिल्या आयएनएस संधायक नौकेचे जलावतरण फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात आले होते. या जहाजात पूर्ण किनारी आणि खोल पाण्याचे सर्वेक्षण करण्याची, तसेच समुद्रशास्त्रीय माहितीचे संकलन करण्याची क्षमता आहे. यासोबतच ही नौका त्यावर असलेल्या हेलिकॉप्टर आणि रुग्णालयामार्फत मानवतावादी दृष्टिकोनातून शोध आणि बचाव मोहीम (SAR) राबवण्यास सक्षम आहे.
सर्वेक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि शाश्वत हायड्रोग्राफिक सहाय्यासारख्या सहयोगाद्वारे तांत्रिक देवाणघेवाण सुलभ करणे आणि संस्थात्मक संबंध मजबूत करणे, हा, क्लांग बंदराला या नौकेने दिलेल्या या पहिल्या भेटीचा उद्देश आहे. या भेटीदरम्यानच्या प्रमुख उपक्रमांमध्ये तपशिलवार माहितीच्या देवाणघेवाणीची सत्रे, अधिकृत स्वागत आणि आंतरराष्ट्रीय सद्भावना वाढवण्यासाठी तसेच महासागर (प्रदेशांमधील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती) दृष्टिकोनाची जागरूकता वाढवण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमांचा समावेश आहे. प्रादेशिक सागरी सहकार्याप्रती भारताच्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करणारी ही भेट आहे.