एन जगदीसनचा संघात समावेश
लंडन : पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळी अखेरच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले की, पंतच्या जागी एन जगदीसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंतला मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल. पुरुष निवड समितीने ३१ जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी ऋषभ पंतच्या जागी नारायण जगदीशनचा संघात समावेश केला आहे.
पंतच्या जागी टीम इंडियामध्ये स्थान मिळवणारा विकेटकीपर फलंदाज एन जगदीसन आहे. २४ डिसेंबर १९९५ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या जगदीसनने भारतासाठी पदार्पण केलेले नाही. पणत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. २९ वर्षीय या फलंदाजाने ५२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३३७३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १० शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, जगदीसनने ६४ लिस्ट ए सामन्यांमध्ये २७२८ धावा आणि ६६ टी-२० सामन्यांमध्ये १४७५ धावा केल्या आहेत. उजव्या हाताचा हा फलंदाज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १६२ धावा आहेत.