प्रियंका गांधींच्या गाझावरील पोस्टला इस्रायलचे कडक शब्दात उत्तर

0

नवी दिल्ली : गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिक मारले गेले आहेत. इस्रायली सैन्याने संपूर्ण गाझा ताब्यात घेण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर वाद वाढत आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यात त्यांनी, इस्रायलने १८,४३० मुलांसह ६० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतल्याचं आरोप केला आहे. यावर आता “तुमचे चुकीचे वर्णन लज्जास्पद आहे, आम्ही हमासच्या २५ हजार दहशतवाद्यांना मारले अशी कडक प्रतिक्रिया भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी दिली आहे.

रुवेन अझर म्हणाले की, “तुमचे चुकीचे वर्णन लज्जास्पद आहे. इस्रायलने २५ हजार हमास दहशतवाद्यांना ठार मारले आहे. मानवी जीवनाचे मोठे नुकसान हे हमासच्या घृणास्पद धोरणांचे परिणाम आहे. जसे की नागरिकांच्या मागे लपणे, मदत किंवा निर्वासन कामगारांवर गोळीबार करणे आणि रॉकेट डागणे.” रुवेन अझर यांनी असेही म्हटले की, इस्रायलने गाझामध्ये २० लाख टन अन्नपदार्थ पाठवले, परंतु हमासने ते जप्त करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे उपासमार झाली. त्यांनी असाही दावा केला की गेल्या ५० वर्षांत गाझाची लोकसंख्या ४५० टक्क्यांनी वाढली आहे, त्यामुळे तेथे नरसंहाराचा प्रश्नच उद्भवत नाही. हमासच्या आकडेवारीवर विश्वास ठेवू नका.

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, “इस्रायल नरसंहार करत आहे. त्यांनी १८,४३० मुलांसह ६० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. शेकडो लोकांना उपासमारीने मरण पत्करावे लागले आहे, ज्यात अनेक मुले आहेत आणि आता लाखो लोकांना उपासमारीची धमकी दिली जात आहे.” असे म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की,”मौन आणि निष्क्रियतेद्वारे या गुन्ह्यांना चालना देणे देखील गुन्हा आहे. इस्रायल पॅलेस्टाईनच्या नागरिकांवर हा विध्वंस करत असताना भारत सरकार गप्प आहे हे लज्जास्पद आहे.”असे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले.

गाझा युद्धाबद्दलचे हे वक्तव्य दोन्ही बाजूंमधील खोल वैचारिक आणि राजकीय दरी दर्शवते. एकीकडे, प्रियंका गांधी याला मानवतेविरुद्धचा गुन्हा आणि नरसंहार म्हणत आहेत, तर दुसरीकडे इस्रायल दावा करते की ते हमास दहशतवादाविरुद्ध लढत आहे आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech