उरीत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना एक भारतीय जवान शहीद

0

श्रीनगर : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. अशातच, जम्मू-कश्मीरमधील उरी भागात सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.दरम्यान झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. गेल्या १३ दिवसांत दहशतवाद्यांशी लष्कराची ही तिसरी चकमक आहे. सध्या बारामुल्ला आणि उरी सारख्या संवेदनशील भागात शोध मोहीम सुरू आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्टच्या उशिरा रात्री घुसखोरांनी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील चिरुंडा गावात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवादी आणि सैन्यातील चकमकीत एक जवान शहीद झाला. चकमक अजूनही सुरू असून, सैन्याने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात चकमकी झाल्या आहेत.

एक आठवड्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड, कठुआ, बारामुल्ला येथे एकाच वेळी ३ ठिकाणी चकमकी झाल्या. बारामुल्लाच्या चक टप्पर क्रीरी पट्टन भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना ठार मारले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील जप्त केला आहे. तर, दुर्दैवाने २ जवान शहीद झाले, तर इतर दोघे जखमी झाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने भारताकडे शस्त्रसंधीसाठी गयावया केली होती, तेव्हा भारताने हल्ले थांबवले होते. मात्र आता पुन्हा पाकिस्तान आपल्या जुन्या कारवायांकडे परतत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech