मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री

0

मुंबई : महाराष्ट्राचे सुपूत्र भारताचे सरन्यायाधीश झाले. महाराष्ट्राचा मराठी माणूस भारताच्या सर्वोच्चपदी पोहोचल्याने राज्याला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवता आणि संवेदनशीलता हा सरन्यायाधीश गवई यांच्या स्वभावातील महत्वाचा गुण आहे. राज्यात न्यायाधीश असताना त्यांनी विविध महत्वाच्या संदर्भात व्यापक जनहित पाहून न्यायदानाचे काम करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नागपूरमधील झोपडपट्टी तोडून टाकण्याचा निर्णय झाला, त्यावेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावून त्यावर तोडगा काढून स्थगिती मिळवून दिली. अतिशय सामान्य माणूस असा असामान्य होऊ शकतो, हे सरन्यायाधीश गवई यांनी दाखवून दिले आहे.

आमदार निवासात राहायला असताना ते जनतेच्या राहण्याची व्यवस्था करून स्वत: व्हरांड्यात बसून अभ्यास करीत. मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही. टायगर कॉरिडॉरच्यावेळी रस्त्याची अनेक कामे अडलेली होती, मात्र सरन्यायाधीश गवई यांनी यावर समिती नेमून मानवतेचा दृष्टिकोन, व्यापक जनहित समोर ठेवून न्यायदान केले. यामुळे अडलेली कामे पूर्ण होऊ शकली, अशी त्यांच्याबद्दलची आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली. सरन्यायाधीश गवई हे समन्वय आणि चर्चेतून प्रत्येक विषयावर मार्ग काढतात. सर्वांसाठी समान न्याय करतात. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या हातून चांगले न्यायदानाचे काम होऊन त्याची इतिहासात दखल घेतली जाईल, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech