कल्याणमधील न्यू गोविंदवाडी रस्त्याचे अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन
(दत्ता भाटे)
कल्याण : पावसाने उसंत घेऊन आठवडा उलटला तरी देखील कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम असून रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर आज कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषणाला सुरवात करत कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण करत अनोखे आंदोलन केले आहे.
प्रभाग क्रमांक ४५ कचोरे येथील रस्ते दुरुस्तीसाठी कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पत्र दिले होते. या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे देखील आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्यास त्रास होत आहे. तसेच वाहन चालकांना देखील त्रास होत आहे. यास रस्त्याच्या बाजूला दोन शाळा आहेत. या शाळेतून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शाळेत येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. आजारी असलेल्या रुग्णांना तसेच गर्भवती स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये नेताना अशा रस्त्यांवर दुर्घटना होऊ शकते.
गणपती आणि नवरात्री हे सण देखील येऊन गेले आता दिवाळी येईल परंतु पत्र देऊन देखील नागरिकांसाठी रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषण सुरु केले असून पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्यांवरील या खड्ड्यामध्ये झाडं लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण केले आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी दिला आहे.