डेहारडून : सततच्या पावसामुळे आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा असल्याने केदारनाथ यात्रा ३ सप्टेंबरपर्यंत तात्पुरती थांबवण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी प्रतीक जैन म्हणाले की, सर्व संबंधित विभागांना पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे १ ते ३ सप्टेंबरपर्यंत केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना त्यांचा प्रवास सध्या तरी पुढे ढकलण्याचे आणि त्यांच्या घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. जे यात्रेकरू आधीच प्रवासात आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी राहून प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी श्याम सिंह राणा म्हणाले की, हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.