केरळ भाजपा प्रवक्त्याकडून राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, वेणुगोपालांची तक्रार

0

नवी दिल्ली : अभाविपचे माजी नेते आणि सध्याचे केरळ भाजपाचे प्रवक्ते प्रिंटु महादेव यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू अशी धमकी दिली. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. या विरोधात काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. वेणुगोपाल यांनी पत्रात म्हटले आहे की, महादेव भाजपाचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी एका मल्याळम वृत्तवाहिनीवरील चर्चेवेळी उपरोक्त धमकी दिली. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर केंद्र सरकारही यात सहभागी आहे, असे आम्ही समजू, असा गंभीर आरोपही केला आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, हिंसाचार भडकावण्याच्या घटनेतील एक महादेवने जाहीरपणे म्हटले आहे की, राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू. हा ना जीभ घसरण्याचा प्रकार आहे, ना चुकून केलेले आहे. विचारपूर्वक लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षातील अधिकृत प्रवक्त्याकडून अशा प्रकारे विखारी शब्द वापरले जात आहे, त्यामुळे फक्त राहुल गांधींच्याच जीवाला धोका नाही, तर संविधान, कायद्याचे राज्य आणि नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुरक्षेचे उत्तरदायित्वही कमकुवत होतंय. जर तुम्ही या प्रकरणात ठाम आणि सार्वजनिकपणे कारवाई करण्यात अपयशी ठरलात, तर यात सरकारही सामील आहे, असे मानले जाईल.

विरोधी पक्षनेत्याविरोधातील हिंसेला वैध करण्याचे आणि परवाना देण्याचे, तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेचे गंभीर उल्लंघन आहे, असेही वेणूगोपाल यांनी म्हटले आहे. दरम्यान वेणुगोपाल यांनी एक्सवर पत्र पोस्ट करत त्यात म्हटले आहे की, राजकीय क्षेत्रातील मतभेद राजकीयदृष्ट्या आणि संवैधानिक चौकटीत सोडवायला हवेत. मात्र भाजपाचे नेते त्यांच्या विरोधकांना लाईव्ह टीव्हीवर जीवे मारण्याची धमकी देत आहेत. निश्चितच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विचारसरणी विरुद्ध राहुल गांधींच्या लढाईने त्यांना अस्वस्थ केलेले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech