कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन झाले आहे. याठिकाणी १८ ऑगस्टपासून रितसर कामकाज सुरु होणार आहे. भाऊसिंगजी रोडवरील राधाबाई बिल्डींग आणि परिसरात आवश्यक त्या सोयी सुविधा आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. सर्किट बेंचमुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. सीपीआर समोर असणारी जिल्हा न्यायालयाची इमारत सन १८७४ मध्ये बांधण्यात आली. जिल्हा न्यायालयाचा परिसर साधारण ४२०० चौरस फूट क्षेत्र आहे. कसबा बावडा येथील जागेत जिल्हा न्यायालयाची नवी इमारत स्थलांतरीत झाल्यामुळे ही इमारत बंद होती, परंतू काही इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे काम करण्यात येत होते. या मूळ इमारतीचे अत्यंत कमी वेळेत नूतनीकरण करुन याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज होत आहे. न्यायदानाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळे नवी झळाळी मिळाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून केवळ एका महिन्यात सर्किट बेंच इमारतींची डागडुजी आणि नूतनीकरण होत या परिसराचा कायापालट झाला आहे. यामुळे हा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाची वेळ निश्चित झाली आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत पहिले सत्र दुपारी १.३० ते २.३० मधली सुट्टी व त्यानंतर दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत दुसरे सत्र सुरु राहील. कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या हेरिटेज इमारतीत डिव्हिजन बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीत दोन्ही न्यायमूर्तींचे स्वतंत्र खासगी कक्ष आणि कार्यालयीन कक्ष आहेत.
या परिसरात जुन्या हेरिटेज इमारतीत एक डीव्हीजनल बेंच आहे. तर आरसीसी इमारतीत 2 सिंगल बेंच आहेत. या इमारतीत रजिस्ट्रार कक्ष, न्यायालयीन कामातील कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था, रेकॉर्ड रुम करण्यात आली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजव्या बाजूच्या दुमजली इमारतीत सरकारी वकिलांची कार्यालये आहेत. या इमारतीसमोर असलेल्या छोट्या दुमजली इमारतीत काही सरकारी वकिलांची कार्यालये आहेत. परिसरात मध्यस्थी कक्ष करण्यात आला आहे. ऐतिहासिक अशा राधाबाई बिल्डिंगमध्ये रजिस्ट्रार यांचे कार्यालय, रेकॉर्ड रुम, स्ट्रॉंग रुम व कार्यालये आहेत. नूतनीकरणामुळे या इमारतीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या इमारतीमध्ये न्यायाधीशांसाठी लॉन्ज, सरकारी वकिलांसाठी कक्ष तयार करण्यात आला आहे.
या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल. या सर्किट बेंचमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत होईल. शिक्षण, उद्योग, व्यापार, पर्यटन आदी विविध क्षेत्रांचा विकास साधला जाईल. या सर्किट बेंचमुळे कायद्याचे अभ्यासक, वकिल व विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील.