कोल्हापूर : कोल्हापूरच्या जनतेने आपल्याला भरभरून दिले आहे.त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच मी अजित पवार यांच्याकडे वैद्यकीय खाते जाणीवपूर्वक मागून घेतले.या खात्याला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलाय,करतो आहे.भविष्यात संपूर्ण राज्यात किंबहुना देशात वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोल्हापूर शहर व जिल्ह्याची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात अत्याधुनिक एम.आर.आय.सिटी स्कॅन,मॅमोग्राफी, अल्ट्रा सोनोग्राफी सुविधा तसेच अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे लोकार्पण केल्यानंतर शेंडा पार्क येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.अमल महाडिक, आदिल फरास, राजर्षी छ. शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजित लोकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील,महेश सावंत, अनिकेत जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य.अभियंता रोहित तोंदले,डॉ गिरीश कांबळे आदी उपस्थित होते .
ते पुढे म्हणाले , सीपीआर येथे ज्येष्ठ नागरिक तसेच दारिद्रय रेषेखालील रुग्णांसाठी एमआरआय ,सिटीस्कॅनची सुविधा मोफत राबविण्यात येणार आहे.या ठिकाणीआणण्यात आलेल्या मशिन्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत .त्यामुळे रुग्णांचे अचूक निदान होवून त्यांच्यावर पुढील उपचार तात्काळ करणे सोयीचे होईल.तसेच या ठिकाणी जंतुसंसर्गाचा धोका नसेल.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगून सीपीआरच्या अत्याधुनिक तसेच सर्व सोयी – सुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा मानस मुश्रीफ यांनी यावेळी बोलून दाखवला.
तर कोल्हापूरच्या आरोग्य क्षेत्रात स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांचेही मोलाचे योगदान असल्याचे सांगत आ.अमल महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांनी शेंडापार्क व सीपीआरच्या अत्याधुनिकीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. कोल्हापूरच्या आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचे डॉ.अजित लोकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.या प्रसंगी आदील फरास यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ४८० इतकी आसन क्षमता असलेल्या अत्याधुनिक ऑडिटोरियमची पहाणी श्री मुश्रीफ यांनी प्रमुख अधिकाऱ्यां समवेत केली.