कोलकाता गँगरेप प्रकरण; चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

कोलकाता : कोलकात्याच्या कसबा परिसरातील लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात अलीपूर न्यायालयाने चौघा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापैकी मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याला यापूर्वीच ८ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. उर्वरित प्रमित मुखर्जी, झैब अहमद आणि पिनाकी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून सर्व आरोपी कायद्याचे विद्यार्थी आहेत.

या खळबळजनक प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी संघटनांची कार्यालये बंद करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती स्मिता दास डे यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या निवडणुका होईपर्यंत ही कार्यालये बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले. तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड तपासादरम्यान पोलिसांनी उघड केले की आरोपींनी गुन्हा आधीपासून नियोजनबद्ध केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडितेला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये नेल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत असून, तिच्या वैद्यकीय अहवालातही बलात्काराच्या घटना आणि मारहाणीची पुष्टी झाली आहे.पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल कॉल रेकॉर्डसह मेडिकल स्टोअरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.

घटनास्थळी आढळलेल्या बेडशीटवरील डाग, आरोपीच्या शरीरावरील ओरखडे आणि पीडितेच्या जबाबांशी जुळणारे पुरावे हे सर्व तपासाची दिशा बलात्काराच्या सिद्धतेकडे नेत आहेत. मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा २०२२ साली लॉ कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर २०२४ मध्ये तात्पुरता फॅकल्टी म्हणून नियुक्त करण्यात आला होता. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी कमतरतेमुळे ही नेमणूक करण्यात आली. मात्र मनोजित मिश्रा त्याच्यावर विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरवल्याचे आरोप आहेत. अनेक मुलींनी त्याच्यामुळे कॉलेजला जाणे बंद केल्याचे सांगितले आहे. तो मुलींचे फोटो काढून ग्रुपमध्ये शेअर करायचा आणि सतत प्रपोज करायचा, असेही आरोप आहेत.

या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. आरोपींचे सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. याशिवाय, पीडितेला नुकसानभरपाई देणे आणि शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नागरी स्वयंसेवक तैनात करण्याची मागणीही या याचिकेत आहे. हा प्रकार घडण्यापूर्वी, ऑगस्ट २०२४ मध्ये कोलकात्याच्याच आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोषी आढळलेल्या नागरी स्वयंसेवकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

त्या घटनेनंतर राज्यभर आंदोलन झाले होते आणि दोन महिन्यांहून अधिक काळ आरोग्य सेवा ठप्प होती. सध्या पोलिसांचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपवण्यात आला असून, आरोपींच्या गुन्ह्याची गांभीर्याने चौकशी सुरू आहे. पीडितेची ओळख उघड झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, कॉलेज प्रशासनाने आरोपींच्या नियुक्त्या आणि सदस्यत्व रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाकडून या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि सीबीआय चौकशीवरील निर्णय लवकरच होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech