पणजी : भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) येथे भारतीय नौदलाच्या आयसीजीएस अजित आणि आयसीजीएस अपराजित या दोन प्रगत वेगवान गस्ती नौकांचे (एफपीव्ही) जलावतरण केले आणि भारताच्या सागरी सुरक्षेला बळकटी देण्यात एक महत्वाचा टप्पा गाठला. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधल्या जात असलेल्या स्वदेशी बनावटीच्या आठ एफपीव्हीच्या मालिकेतील हे सातवे आणि आठवे जहाज असून, देशाच्या किनारपट्टीवरील देखरेख आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पूर्णपणे जीएसएलने डिझाइन केलेली आणि बांधलेली एफपीव्ही भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे वाढते सामर्थ्य प्रतिबिंबित करतात. 52 मीटर लांबीची आणि 320 टन वजन वाहून नेणारी ही जहाजे कंट्रोलेबल पिच प्रोपेलर्स (सीपीपी) ने सुसज्ज आहेत, तसेच भारतातील या श्रेणीतील ही पहिलीच जहाजे असून, उत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी आणि प्रोपल्शन कार्यक्षमता देतात. या गस्ती नौका मत्स्यव्यवसाय संरक्षण, किनारी गस्त, तस्करी विरोधी, चाचेगिरी विरोधी आणि विशेषतः भारताचे बेट प्रदेश आणि विशेष आर्थिक क्षेत्रात शोध आणि बचाव मोहिमा, यासारख्या बहु-कार्यात्मक भूमिका बजावण्यासाठी सक्षम आहेत.
या जहाजांचे जलावतरण मंजू शर्मा यांनी केले. यावेळी वित्तीय सल्लागार (संरक्षण सेवा) डॉ. मयंक शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला आयसीजी क्षेत्र (पश्चिम) चे कमांडर महानिरीक्षक भीष्म शर्मा, यांच्यासह भारतीय तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयसीजी आणि जीएसएल यांच्या कामगिरीबद्दल बोलताना डॉ. मयंक शर्मा यांनी देशांतर्गत उद्योग, रोजगार निर्मिती आणि एमएसएमई परिसंस्थेत या प्रकल्पाने दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि असे उपक्रम सागरी क्षमतेत राष्ट्रीय स्वयंपूर्णतेला कशी बळकटी देत आहेत, यावर भर दिला. दोन एफपीव्हीच्या समावेशासह, भारतीय तटरक्षक दलाने आधुनिक, अति-वेगवान प्लॅटफॉर्मच्या ताफ्याचा विस्तार सुरू ठेवला आहे, त्यामुळे भारताच्या विशाल सागरी किनारपट्टीवर वर्धित परिचालन सज्जता आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित झाली आहे. या जलावतरणामुळे देशासाठी पुढील पिढीची स्वदेशी संरक्षण जहाजे तयार करण्यात जीएसएलचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.