मुंबई नेव्ही नगरमध्ये अग्निवीर जवानाच्या हातातून लोडेड रायफल चोरीला

0

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्युटीवर असलेल्या अग्निवीर जवानाच्या हातातून फुल लोडेड रायफल अज्ञात व्यक्ती चोरी करून घेऊन गेला. विशेष म्हणजे, चोरट्याने नौदलाच्या शीघ्र कृती दलाच्या वेशात येऊन जवानाला फसवले. या रायफलमध्ये तीन मॅगझिन आणि तब्बल ४० राऊंड्स होते. ६ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस आणि नौदल दोन्ही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने अग्निवीरला जेवणाची वेळ झाल्याचे सांगून त्याला रिलिव्ह करण्याचा बनाव केला. त्याने इन्सास रायफल ताब्यात घेतली आणि काही वेळातच घटनास्थळावरून फरार झाला. सुरुवातीला अग्निवीरला तो व्यक्ती नेव्हीतील अधिकारी असल्याचा भास झाला. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने वरिष्ठांना माहिती दिली.

या प्रकाराची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला असून कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसलाही सतर्क करण्यात आले असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. तसेच, नेव्हीकडून स्वतंत्र चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. घुसखोर नेव्हीचा गणवेश मिळवून जवानापर्यंत कसा पोहोचला, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे मुंबईसह आसपासच्या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका जवानाच्या हातून भरलेली रायफल चोरी जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने या घटनेला पूर्वनियोजित कटाची शक्यता नाकारली जात नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘ह्युमन बॉम्ब’स्फोटाची धमकी मिळाली होती. १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा आणि त्यांच्या ताब्यात ४०० किलो आरडीएक्स असल्याचा संदेश प्राप्त झाला होता. अशा पार्श्वभूमीवर नेव्ही नगरमधील हा प्रकार आणखी चिंताजनक ठरत आहे. मुंबईत सध्या हायअलर्ट जारी असून तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech