काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

0

नागपूर : काँग्रेसने व्होट बँक डोळ्यापुढे ठेवून भगव्या दहशतवादाचे षडयंत्र रचले. तसेच या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू संघटनांना यात नाहक गोवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी नागपुरात केले. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, मालेगावात 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर रचलेले षडयंत्र न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांसमोर उघडे पडले आहे. तत्कालिन काँग्रेस सरकारने मतांच्या राजकारणासाठी भगवा दहशतवाद हा शब्द तयार केला होता. संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना होत होत्या व इस्लामिक दहशतवाद हा जगात चर्चेचा विषय होता. त्यामुळे एका विशिष्ठ व्होट बँकेला डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसने इस्लामी दहशतवादाच्या धर्तीवर हिंदू दहशतवाद हा खोटा नॅरेटिव्ह तयार करण्याचे कुभांड रचले. त्यासाठी खोटी थिअरी तयार करून लोकांना अटक करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे हे षडयंत्र होते. मात्र खूप प्रयत्न करूनदेखील कुठलाही पुरावा सरकार गोळा करू शकले नाही. याबाबत हळू हळू लोक बोलतील व अनेक गंभीर बाबी समोर येतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अनेक दहशतवादी घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले होते. त्यातून इस्लामिक दहशतवाद हा नॅरेटिव्ह जगात तयार झाला होता. संपूर्ण मुस्लिमांना कुणीही दहशतवादी ठरविले नव्हते. मात्र सर्व हिंदूंना दहशतवादी ठरविण्यासाठी यूपीए आणि काँग्रेसने षडयंत्र रचले होते. त्यांनी पोलीस यंत्रणेतील तत्कालिन अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. पुरावे नसतानादेखील कारवाई करा असे अलिखित निर्देश देण्यात आले होते. मात्र काही अधिकारी या दबावाला बळी पडले नाहीत. आता याचा भंडाफोड झाला आहे. त्यावेळच्या देश व राज्यातील सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपविण्यासाठी प्रयत्न कसा केला होता हे जगासमोर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये होते. त्यांच्याच सरकारने भगवा दहशतवाद हा शब्द आणला होता. तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आठवला नव्हता का ? असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, कोकाटे यांच्या बाबतीत जी घटना घडली त्यानंतर जनतेत रोष होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेअंती कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी मंत्रीमंडळात कुठलाही दुसरा बदल होईल अशी शक्यता नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहे. आम्ही काय बोलतो, कसे वागतो हे जनता पाहत असते. त्यामुळे वागताना नियंत्रित वागले पाहिजे. आता मंत्रीमंडळातील कुठल्याही सदस्याने बेशिस्त वर्तन केले तर ते खपवून घेणार नाही व त्यांच्यावर कारवाई होईल. आम्ही तिघांनीही हे निश्चित केले आहे. हा सर्वांसाठी संकेत आहे, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech