नांदणी (जि. कोल्हापूर) येथील मठात आणण्यासाठीच्या सर्व अनुमती २० दिवसांत घेण्याचे उच्चाधिकार समितीचे आदेश
कोल्हापूर : नांदणी मठातील वनतारा येथे असणार्या ‘माधुरी’ हत्तिणीची आरोग्य पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे माजी नायमूर्ती दीपक वर्मा यांच्या नेतृत्वाखाली असणार्या उच्चाधिकार समितीने दिले आहेत. त्यानुसार ३१ ऑक्टोबरला वनतारा येथे राज्य शासन, नांदणी मठ आणि वनतारा प्रशासन यांच्याकडून माधुरीची पडताळणी केली जाईल. माधुरीला गुजरात येथून महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आवश्यक त्या अनुमती २० दिवसांत घ्या, असेही समितीने आदेशात नमूद केले आहे. त्यासाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण, वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि अन्य विभागांची अनुमती लागणार आहेत.
माधुरी हत्तीण घरी परत येण्यासाठी जैन मठ आणि वनतारा यांच्याकडून अधिवक्ता मनोज पाटील यांच्याकडून संयुक्त प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. या प्रस्तावावर समितीसमोर सुनावणी झाली. माधुरीच्या देखभालीसाठी वनतारा सुसज्ज असे केंद्र सिद्ध करेल, त्यासाठी जैन मठ नांदणी गावात भूमी देईल, असे अधिवक्ता पाटील यांनी सांगितले. याची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे.
माधुरी हत्तिणीवरून लोकांनी आंदोलनाच्या कालावधीत अनंत अंबानी यांच्यावर आरोप केले. यानंतर वनताराने ‘या हत्तिणीची वनताराने कधीच मागणी केलेली नाही. या प्रकरणात आम्ही केवळ न्यायालयाने दिलेले आदेश पूर्ण करत आहोत. जर न्यायालयाने आम्हाला आदेश दिले, तर आम्ही माधुरीला परत कोल्हापुरात पाठवू, तसेच तिची जशी काळजी वनतारामध्ये घेतली जातेय तशीच कोल्हापुरातील मठात घेण्याचीही सोय उपलब्ध करून देऊ’, असे स्पष्टीकरण दिले होते.