मुंबई : अनेक शतकांपासून अव्याहत सुरु असलेली पंढरपूरची वारी ही जगातील अद्भुत लोकपरंपरा आहे. श्रद्धा, भक्ति व समतेची ही वारी गरीब – श्रीमंत व तरुण – वृद्ध असे सर्व भेद मिटवणारी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले. आषाढी एकादशी निमित्त चेंबूर मुंबई येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे आयोजित आषाढी एकादशी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी उपस्थित अधिकांश दक्षिण भाषिक भाविकांशी संवाद साधताना राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांचा गौरव केला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीने जगाला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास असे अनेक संतश्रेष्ठ दिले असे सांगून, संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहोचवली, असेही राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्र भूमीने देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक दिले असे सांगून महाराजांनी स्वधर्माचे रक्षण करताना इतर धर्मांचा यथायोग्य आदर केला, असे राज्यपालांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज सच्चे धर्मनिरपेक्ष शासक होते. भारतीय लोक देखील स्वभावत:च धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करणारे आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.
आद्य शंकराचार्यानी देशातील विविध भागांमध्ये धर्मपीठ स्थापन करुन धर्म रक्षणाचे कार्य केले असे सांगताना शंकराचार्य नसते तर सनातन धर्म टिकला नसता, असे राज्यपालांनी सांगितले. मंदिरातर्फे चालविल्या जाणाऱ्या मानवतावादी कार्याबद्दल विश्वतांचे अभिनंदन करून राज्यपालांनी सुवर्ण भारती आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्य सेवकांना कौतुकाची थाप दिली. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत अन्नछत्र चालविण्यात योगदान देणाऱ्या महिला स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.
श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराचे मानद व्यवस्थापक डॉ जी मुथुकृष्णन यांनी आपल्या प्रास्ताविकात मंदिरातर्फे चालविल्या जाणाऱ्या धार्मिक अनुष्ठानाची तसेच सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. श्री शृंगेरी शंकर शारदा पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री भारती तीर्थ यांच्या सन्यास दीक्षेचे यंदा पन्नासावे वर्ष असून त्यांच्या प्रेरणेने मंदिरातर्फे धार्मिक अनुष्ठानाशिवाय अन्नदान व वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरातर्फे गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेकचे मोठे कार्य केले जात असून आतापर्यंत १ लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिरातर्फे ३०० महिलांना शिलाई यंत्र देण्यात आले असून मानसिक दृष्ट्या दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या नाशिक, बदलापूर व सातारा येथील संस्थेला मदत केली जात असल्याचे मंदिराच्या सुवर्ण भारती आरोग्य केंद्राचे विश्वस्त डॉ कुमारस्वामी यांनी सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी श्री शृंगेरी शंकर मठ येथील देवी शारदा, श्री गणेश व शंकराचार्य यांच्या प्रतिमांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला मंदिराचे विश्वस्त मोहन सुब्रमण्यम, जुना हनुमान मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुबोध आचार्य, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती आदी उपस्थित होते. यावेळी आषाढी एकादशीनिमित्त गायिका पूजा गोपालन व त्यांच्या संगीत कला चमूने यांनी मराठी, हिंदी व तामिळ अभंग व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.