नागपूरमध्ये १० ऑक्टोबर रोजी सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा

0

नागपूर : प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे पण ओबीसीमधून आरक्षण द्यायला मात्र सकल ओबीसी संघटनांचा विरोध आहे. याच भूमिकेतून विदर्भातील सकल ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी नागपूर इथे महामोर्चाचे आयोजन केले आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयात पात्र हा शब्द वगळण्यात आला त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळू शकते यातून ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. सरकारच्या निर्णयानंतर मराठवाड्यात काही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले. सरकारने जो शासन निर्णय जारी केला यातून ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार आहे. म्हणूनच विदर्भातील सर्व ओबीसी संघटना एकवटल्या. विदर्भातील जिल्हा जिल्ह्यात ओबीसी संघटनांनी बैठका घेऊन या शासन निर्णयाला विरोध करण्याचा ठराव झाला.

गोंदिया जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी ओबीसी संघटनांनी आक्रोश मोर्चा देखील काढला होता. पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चे निघून या शासन निर्णयाला विरोध करण्यात आला. तसेच पश्चिम विदर्भात यवतमाळ, वाशिम,वर्धा अमरावती, बुलढाणा,अकोला इथे देखील मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी २ सप्टेंबरला शासन निर्णयाला विरोध करणारे मेळावे घेतले. यातूनच महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात विदर्भातील सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चा हा राज्य सरकारला इशारा आहे की सरकार ओबीसी समाजाला गृहीत धरू शकत नाही! एका समाजाच्या दबावाखाली येऊन सरकार जर ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणार असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही हा संदेश या मोर्चातून देण्यात येणार आहे.

नागपुरातील मोर्चासाठी विदर्भातील विविध जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आहे. लोकांनी या मोर्चासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून १० तारखेला विदर्भाच्या काना कोपऱ्यातून ओबीसी समाज नागपुरात एकवटणार आहेत. हा मोर्चा नागपूर इथे यशवंत स्टेडियम इथून सुरू होऊन संविधान चौकात संपणार आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आहे अस ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण जर कोणी हिसकावून घेत असेल तर त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी समाज एकवटला आहे हा लढा कोणत्याही दुसऱ्या समाज विरोधात नाही तर ओबीसी हक्कासाठी आहे अस वडेट्टीवार म्हणाले. म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी,त्यांच्या न्याय हक्कासाठी या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी नेते वडेट्टीवर यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech