सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरु करण्याबाबत विचारविनिमय करणार – राज्यपाल

0

मुंबई : योग हा भारताचा अमूर्त वारसा असून देशाचे जगाला योगदान आहे. देशाचा आर्थिक विकास होत असताना लोकांच्या जीवनातील ताणतणाव वाढत आहे. मन तणावमुक्त नसेल तर आरोग्य चांगले राहणार नाही. यास्तव सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरु करण्याबाबत कुलगुरुंशी विचारविनिमय करणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज (दि. २१) येथे केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजभवन येथे आयोजित योगसत्रात सहभागी झाल्यानंतर राज्यपाल बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आज संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून जगभर योग दिवस साजरा केल्या जात आहे. आज जगात अनेक देशात लोक योग करोत आहेत. परंतु आपल्या देशात बहुतेक लोक चाळीशी – पन्नाशी ओलांडल्यानंतर योग सुरु करतात. लहानपणापासून योग करण्याची सवय लावून घेतली, तर अधिकाधिक लोकांना निरामय जीवन जगता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

योग म्हणजे निव्वळ शारीरिक असणे नसून योग ही जीवन पद्धती म्हणून अंगिकारली पाहिजे व किमान अर्धा तास योगसाठी दिला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी योग प्रशिक्षक रवी दीक्षित तसेच कैवल्यधाम संस्थेचे डॉ गणेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपालांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगासने, प्राणायाम व योग क्रिया केल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech